‘सिंधू-सरस्वती संस्कृती भारतीयांनीच वसवली’ – ऋत्विज आपटे

 

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात ‘इतिहास : शोध आणि बोध’ अभियान मंडळाचा उदघाटन कार्यक्रमात प्रतिपादन

रत्नागिरी | प्रतिनिधी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात ‘इतिहास: शोध आणि बोध’ अभियान मंडळाचा उदघाटन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते ऋत्विज आपटे यांनी ‘अभ्यास: इतिहास आणि पुरातत्वाचा’ या विषयात ‘सिंधू-सरस्वती संस्कृती भारतीयांनीच वसवली’ असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, प्रा. निनाद तेंडुलकर, सहकारी शिक्षक आणि मंडळाचे सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत ‘इतिहास: शोध आणि बोध’ अभियान मंडळाचे समन्वयक प्रा. निनाद तेंडुलकर यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांनी आपल्या मनोगतात
वर्षभरातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या व्याख्यानात श्री. ऋत्विज आपटे यांनी पुरातत्वातील नवीन संशोधनावर
प्रकाश टाकत ही नवीन संशोधने इतिहास लेखनाला कशी सहाय्यभूत ठरतात याविषयी उदहरणे देत माहिती दिली. आंध्रप्रदेशातील मल्लपट्टूगुडू येथे उत्खननात ५० हजार वर्षापूर्वीचे शहामृगाचे अंड्याचे घरटे सापडले आहे व त्याच्या शेजारील परिसरात दगडी हत्यारे सापडली आहेत. इंडोनेशियात जगातील सर्वात प्राचीन ५१ हजार वर्षांपूर्वीचे भित्तीचित्र सापडले आहे. सिंधखेडराजा येथे लखुजी जाधव यांच्या वाड्याशेजारी ११व्या शतकातील शिवमंदिर व शेषाशाही विष्णूची मूर्ती सापडली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे २०१५मध्ये सिंधू संस्कृतीच्या राखीगडी या ठिकाणी उत्खनन करताना ७० मानवी
सांगाडे सापडले. त्यापैकी एका सांगाड्यातून डीएनएप्राप्त करण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले आहेत. सदर डीएनए आजच्या भारतीय डीएनए सोबत जुळतो. यावरून सिंधू संस्कृतीतील रहिवासी हे बाहेरून आले नव्हते तर ते मुळचे भारतीय आहेत हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.

ऋत्विज आपटे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे संस्कृत विषयात पदवी घेतली आहे व डेक्कन महाविद्यालयात प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्व या विषयात पदविका संपादन केली आहे. गेली नऊ वर्षे ते पुरातत्व शास्त्र या विषयात व कोकणातील कातळशिल्पांवर काम करत आहेत. साध्य ते आयआयटी, मद्रास येथे रिसर्च असोसिएट आणि सी.इ.एम.एस., मुंबई विद्यापीठ येथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी डेक्कन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. वसंत शिंदे यांच्यासोबत सिंधू संस्कृतीच्या राखीगडी या साईटवर उत्खननाचे काम केले आहे.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘इतिहास हा काय करावे आणि काय करू नये हे आपलाल्या शिकवतो; त्याच्याकडे डोळसपणे पहिले की आपल्या वर्तमानकाळातील विविध समस्यांचे उपाय सहज सापडतात’ असे सांगितले. तसेच त्यांनी मंडळाच्या वर्षभरातील विविध उपक्रमांना आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अन्वी कोळंबेकर यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. अपर्णा तगारे यांनी करून दिला तर आभारप्रदर्शन प्रा. दिलीप जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रा. दत्तात्रय माळवदे, प्रा. गुरुप्रसाद लिंगायत, प्रा. ध्रुपदा साठे यांनी केले.