ओणी येथे राज्यस्तरीय जयवंत दळवी स्मृती एकांकिका स्पर्धेला प्रारंभ
राजापूर (वार्ताहर): कोकण ही कलावंतांची भूमी आहे. या भूमीतून अनेक कलाकार घडावेत अशी सदिच्छा नाट्यअभिनेते, प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक अशोक राणे यांनी येथे व्यक्त केली.
ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ आयोजित कै. जयवंत दळवी स्मृती राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी ओणी येथे नाट्यअभिनेते, प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक तसेच स्पर्धेचे परीक्षक अशोक राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. वासुदेव तुळसणकर होते.
या स्पर्धेची पार्श्वभूमी आपल्या नेटक्या व मोजक्या शब्दांत कार्याध्यक्ष प्रदीप संसारे यांनी मांडली. सुरुवातीपासूनच या स्पर्धेसाठी भरीव योगदान देणाऱ्या संस्था संचालक, मान्यवर, नाट्यकर्मी यांना धन्यवाद दिले.
ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ गेली 8 वर्षे नित्यनेमाने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करीत आहे. ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांना नामवंत नाट्य संस्थांचा कलाविष्कार अनुभवण्याची संधी मिळावी यासाठी संस्थेच्या विविध उपक्रमांपैकी हा एक स्तुत्य उपक्रम आहे. ग्रामीण भागातील नाट्यकर्मी कलावंतांसाठी ओणीचा खुला रंगमंच संस्थेने उपलब्ध करून दिलेला आहे असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर परीक्षक महेंद्र तेरेदेसाई, कार्यवाह गणपत जानस्कर, संस्था संचालक गणपत भारती, नामदेव तुळसणकर, नाट्यकर्मी प्रमोद लिमये, नारायण आंग्रे, श्रीराम तुळसणकर, सूर्यकांत तुळसणकर, विजयकुमार वागळे, संतोष वडवलकर, प्रथमेश वडवलकर, संजय राणे, माजी मुख्याध्यापक शिंदेदेसाई, मुख्याध्यापक तानाजी शिंदे, पर्यवेक्षक विनोद मिरगुले, अॅड. गुरुदत्त खानविलकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश शिंदेदेसाई यांनी तर आभार अॅड. एकनाथ मोंडे यांनी मानले. यावेळी शुभारंभानंतर सादर झालेल्या धिंटॅंग ढिटँग व कॅलीडोस्कोप या एकांकिकांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली.












