निखिल दळी, श्रीकृष्ण खातू यांनी केला भारतीय सैनिकांचा सत्कार
चिपळूण (वार्ताहर) : कारगिल विजय दिन म्हणून २६ जुलै साजरा केला जातो. कारगिल युध्दा मध्ये आपल्या भारतीय सैनिकांनी केलेली नेत्र दीपक कामगिरी कोणीही भारतीय नागरिक विसरू शकत नाही. अशीच या युद्धामध्ये चिपळूण तालुक्यातील ओवळी येथील सैनिक हवालदार राजेंद्र तातोजी शिंदे यांनी या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेत कामगिरी बजावली होती. त्यामुळे आजच्या या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने माजी सैनिक राजेंद्र शिंदे यांचा युवा उद्योजक निखिल दळी, निवृत्त शिक्षक श्रीकृष्ण खातू यांनी संगमेश्वरमध्ये येथे भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. त्यांनी देशाच्या सैनिकांप्रती असलेली कृतज्ञता यातून व्यक्त केली आहे.
1993 साली बेळगाव सेंटर मध्ये ट्रेनिंग घेऊन मराठा लाइट इन्फंट्री मध्ये राजेंद्र शिंदे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अनेक झालेल्या युद्धांमध्ये सहभाग घेत कामगिरी केली बजावली आहे. कारगिल युद्धाला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी राजेंद्र शिंदे प्रत्यक्ष या युद्धा मध्ये मध्ये सहभागी झाले होते. या युद्धात करो या मरो या स्थितीला सामोर जावे लागले होते. सर्व सैनिकांनी या कारगिल युद्धामध्ये अतिशय प्राणपणाने लढत देत विजय मिळवला होता. काही सैनिक या युद्धात शहीद झाले. मात्र देशाचा तिरंगा कारगिल युद्धामध्ये मानाने फडकला . ज्या भारतीय सैनिकांनी या युद्धात प्रत्यक्ष कामगिरी केली त्यांच्यासाठी हा कारगिल विजयी दिन अतिशय अभिमानाचा मानला जातो.
चिपळूण तालुक्यातील ओवळी गावचे सुपुत्र राजेंद्र तातोजी शिंदे यांची सुद्धा आज कारगिल दिनाच्या दिवशी छाती अभिमानाने फुलते . या युद्धातील सैनिक श्री. शिंदे यांचा संगमेश्वर येथील युवा उद्योजक निखिल दळी आणि सेवानिवृत्त शिक्षक श्रीकृष्ण खातू यांनी आज प्रत्यक्ष भेट देत त्यांचा सन्मान केला. भारतीय सैनिक आमच्यासाठी आमचं संरक्षण करणारा आणि आम्हाला अभिमान असणारा आमचा सैनिक आहे, ही भावना मनात ठेवत त्याने त्यांचा सन्मान केला . देशाच्या प्रति आणि सैनिकां बद्दलची असलेली आपुलकी प्रेम त्यांनी या सन्मानातून व्यक्त केले आहे. माजी सैनिक हवालदार राजेंद्र शिंदे यांनी सुद्धा त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.












