जि.प.गुरववाडी शाळेतील विद्यार्थ्यांची साजिरी गांडूळखत प्रकल्पाला क्षेत्रभेट

गुहागर (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौंढरकाळसूर गुरववाडी येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने गावातील साजिरी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या गांडूळखत प्रकल्पाला भेट दिली.

शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौंढरकाळसूर गुरववाडी येथील 50 विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट म्हणून साजिरी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या गांडूळखत प्रकल्पाला आवर्जून भेट दिली.यावेळी बचत गटाच्या सदस्य सौ.स्वाती महाडीक यांनी गांडूळखत तयार होण्यापासून तर विक्री व्यवस्थेपर्यंत संपूर्ण माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली. तसेच गांडूळ हाताळण्याचे प्रात्यक्षिकही दाखवले. दिवसेंदिवस शेतीवर रासायनिक खताचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी गांडूळखत हे उत्तम प्रकारचे खत आहे.या खताच्या वापराने शेतीचा पोत राखून पिकाची प्रतही सुधारते,अशी माहितीही यावेळी सौ.महाडिक यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दिली.

 

 

यावेळी मुख्याध्यापिका स्वप्नाली विचारे,शिक्षक सुनिल वाघे, चंद्रकांत हाये,ग्रामपंचायत सदस्य रूपाली खांडेकर,साजिरा बचत गटाच्या सदस्य रेश्मा रहाटे,ज्योती महाडीक,रंजना खांडेकर,जयश्री खांडेकर,विद्या पवार इ. उपस्थित होते.