आंबेवाडी इंग्रजी माध्यम शाळेच्या नूतन वास्तुचे भूमिपूजन
राजापूर | वार्ताहर : राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आंबेवाडी इंग्रजी माध्यम शाळेच्या नूतन वास्तुचे भूमिपूजन अक्षय्य तृतीया मुहूर्तावर शनिवारी संस्थेचे विश्वस्त ॲड. प्रकाश रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. भूमीपूजनाचे धार्मिक विधी संदीप मालपेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यकारी मंडळाचे कार्यवाह व इंजिनीअर जगदीश पवार-ठोसर यांनी प्रस्ताविकात नैसर्गिक जमिनीच्या ठेवणीप्रमाणे इमारतीची रचना केली असून तळ मजला हा ३५०० चौ.फुट व पहिला व दुसरा मजला प्रत्येकी ७५०० चौ.फुट.असे एकूण १८५०० चौ.फुट एवढे बांधकाम असून त्यामधे १४ वर्गखोल्या, ३ प्रयोगशाळा, शिक्षक रूम, एक मोठा हॉल व स्वछतागृहे यांचा समावेश असल्याची तांत्रिक माहिती दिली.
भूमिपूजन समारंभा प्रसंगी ॲड. श्री. रानडे म्हणाले की माझी दोन्ही मुले राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेमध्ये शिकून मोठी झाली आहेत. त्यामुळे राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेमध्ये शिकणे हे भाग्यकारक आहे. आंबेवाडी सारख्या निसर्गरम्य परिसरात ही नवीन वास्तू दिमाखात उभी राहण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह प्रकाश भावे यांनी सोळा महिण्यापूर्वी मुख्यइमारत जतन संवर्धन काम सुरू करताना संस्थेचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी आणि आम्ही थोडे शाशंक होतो; पण राजापूर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी भरघोस देणगी दिल्याने आम्ही संपूर्ण इमारतीचे जतन संवर्धनाचे काम एका वर्षात पूर्ण केले. मुख्यइमारतीचा ऐतिहासिक वास्तू वारसा पुढील ५०-६० वर्षे दिमाखात टिकणार आहे. इंग्रजी माध्यम नवीन इमारतीला साधारण चार कोटी रुपये लागणार आहेत. यासाठी हितचिंतक मंडळींनी स्वतः देणगी देऊन थांबू नये तर आपल्या संपर्कातील लोकांकडून निधी गोळा करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. असे केल्यास हे अशक्यप्राय वाटणारे आव्हान आपण सहज पेलू शकतो.
कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षा डॉ.सौ. छाया जोशी यांनी सर्वांच्या सहकार्याच्या जोरावर आपण हा प्रकल्प पूर्ण करू असा आपल्याला विश्वास वाटतो असे सांगितले. आभार मुख्याद्यापक निलेश पवार यांनी मानले.
या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त डॉ. श्री. बी. डी. पाध्ये, माजी विश्वस्त दिलीप पाटणकर, प्रमोद अभ्यंकर, सौ. मानसी हजेरी, कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष अभय मेळेकर, सदस्य सतीश रहाटे, अनंत रानडे, ॲड. अतुल नवरे, ॲड. प्रशांत पाध्ये, प्रकाश कातकर, संदीप देशपांडे, हृषीकेश कोळेकर, प्रशांत पवार, राजेंद्र नवाळे, भालशंकरसर, मारुती कांबळे व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.