खेड(प्रतिनिधी) शहरातील मुख्य बाजारपेठेसह तीनबत्तीनाका परिसरात जगबुडीचे पुराचे पाणी घुसून दलदल निर्माण झाली होती. नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत काही तासात परिसर स्वच्छ केला. याबद्दल शिवसेना महिला आघाडीतर्फे आमदार योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
पूरस्थिती ओसरल्यानंतर परिसर स्वच्छ करण्याचे नगरप्रशासनासमोर आव्हान होते. मात्र नगरपरिषदेच्या सर्वच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही तासातच परिसर स्वच्छ केला. यामुळे बाजारपेठ लवकर सुरू होऊ शकली. यावेळी कदम यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या.
याप्रसंगी महिला आघाडीच्या शहर संघटिका माधवी बुटाला, युवती सेनेच्या अॅड. पूनम जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होत्या.










