मनोविकारातून गाठले जंगल
पती, आधारकार्ड माहिती खोटी
बांदा (प्रतिनिधी) : रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या ‘त्या’ अमेरिकन महिलेचा तो बनाव असल्याचे तिने दिलेल्या जबाबात स्पष्ट झाले आहे. ती मनोरुग्ण असून तिच्या पासपोर्टची मुदत संपल्याने अमेरिकेत जाण्यासाठी अडचणी येत असल्याने नैराश्येतून हे कृत्य केल्याची माहिती तिने जबाबात दिली आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच ‘प्रहार’ ने दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. दरम्यान, तामिळनाडू येथील तिरुवेलापुरम येथेही तिने काही वर्षांपूर्वी असाच बनाव केल्याची माहिती तामिळनाडू येथे तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकाला मिळाली आहे. तीचे लग्न, पती हाही बनाव असल्याचे स्पष्ट झाले. तीचे आधारकार्डही फेक असल्याची माहिती मिळाल्याने आधारकार्डची पडताळणी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) माहिती मागविण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
सद्यस्थितीत सदर महिलेवर रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या तब्बेतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी पून्हा तिचा जबाब नोंदविला आहे. त्यावेळी तीने सर्व खरी हकीकत पोलिसांना सांगितली. त्यामुळे स्वरचित प्रकरणाची सत्य बाजू समोर आली आहे.
तिने जबाबत म्हटले आहे की, आपल्या पासपोर्टची मुदत संपली होती. आपल्याला अमेरिकेत परत जायचे होते. यासाठी अमेरिकन दुतावासातून आपले मायदेशी जाण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र या प्रक्रियेला यश मिळत नसल्याने नैराश्येतून स्वतः आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. यासाठी आपण कोकण रेल्वेतून मडुरा येथील स्थानकात उतरले. तेथून स्वतःच जंगलात वाट मिळेल तिथे गेल्याची माहिती दिली. आपल्या व्हिजाची मुदत संपली होती तसेच मला माझ्या नातेवाईकांकडून पैसे येणे बंद झाले होते. आपण स्वतःलाच साखळीने बांधून घेत जंगलात तीन रात्री काढल्या. तिच्या या जबाबमुळे पोलीस देखील चक्रावलेत. तीच्या जबाबातून मानसिक नैराश्येतून हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
*महिलेने दिलेला पत्ता चुकीचा*
महिलेच्या सुरुवातीच्या जबाबवरून तिच्या पती विरोधात बांदा पोलिसात गुन्हा दखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांची दोन पथके संशयिताच्या शोधासाठी तामिळनाडू येथे गेली होती. गेले दहा दिवस पोलीस पथक त्याठिकाणी तपास करत आहेत. मात्र महिलेने दिलेला पत्ता हा चूकीचा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यामुळे तिचे आधारकार्ड हे देखील बनावट असल्याची शक्यता असल्याने आधारकार्डची माहिती मिळण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडे माहिती मागविण्यात आली आहे. पोलिसांचे तामिळनाडू येथे गेलेले पथक हे आणखी काही दिवस तेथे राहून तपास करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
*तामिळनाडूत देखील केला होता बनाव*
तामिळनाडूतील येथील तिरुवेलापुराम येथे महिलेचे वास्तव्य होते. हे ठिकाणी धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी बहुसंख्येने विदेशी पर्यटक येतात. सदरची अमेरिकन महिला देखील याठिकाणी योगाभ्यास करण्यासाठी आली होती. ती मनोरुग्ण असल्याने याठिकाणी देखील तिने असाच प्रकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलीस याची सविस्तर माहिती घेत आहेत. तिच्यावर गोवा, मुंबई व दिल्ली येथे मानसिक आजारावर उपचार झाले आहेत.
महिलेने जबाबत दिलेल्या माहितीची खातरजमा पोलीस करत असून अधिक माहिती मिळवत आहेत. तिच्यावर अमेरिकेत देखील मानसिक उपचार झाले असून याबाबतचे वृत्त ‘प्रहार’ ने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे ती माहिती देखील पोलीस घेत आहेत.
*अमेरिकन दुतावासाची दखल*
अमेरिकन दुतावासाने हा संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली असून याची सविस्तर माहिती भारत सरकारकडून घेतली आहे. अमेरिकेत या महिलेसाठी सोशल मीडियावर कॅम्पनिंग सुरु असल्याने तिला पुन्हा अमेरिकेत मायदेशी पाठविण्यासाठी अमेरिकन दुतावास प्रयत्नशील आहे. यासाठी तिच्यावर सुरु असलेल्या वैद्यकीय उपचारांची माहिती अमेरिकन दुतावास घेत असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला लवकरच मायदेशी पाठविण्यात येणार असल्याचे समजते.
———-











