भाजपा माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी उबाठाच्या मंदार केणी यांची केली पोलखोल 

 

 

मालवण | प्रतिनिधी : उबाठा सेना जिल्हा प्रवक्ते मंदार केणी हे आम्हाला ७.४५ नंतर वेगळ्या भुमीकेत असतात अशी कल्पना होती, मात्र ते उपोषणाला बसले होते, त्यावेळीही वेगळ्याच अवस्थेत होते की काय? अशी शंका त्यांच्या दोन तासांच्या उपोषण स्थळावरील बेताल बडबडीवरून येत आहे. स्पोर्टस् काम्प्लेक्सच्या विषयी जर त्यांची खरी आस्था, तळमळ होती, तर मग अवघ्या दोन तासात उपोषण मागे का घेतले? सदरचा विषय मार्गी लावण्यासाठी अखेरपर्यंत लढा का दिला नाही? मुख्याधिकारी यांनी शहरातील अपूर्ण कामे राहिलेल्या सर्वच ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल असे सांगताच केणी यांनी स्पोर्टस् काम्प्लेक्सच्या ठेकेदारावर कारवाई करण्यात येवू नये अशी भूमीका का घेतली? याचाच अर्थ सदरच्या कामाचे ठेकेदार अप्रत्यक्ष हेच असणार. असा थेट आरोप भाजपा माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी केला आहे.

 

दरम्यान, मालवणच्या खेळाडूंप्रती जर आमदारांना आत्मीयता होती तर मग त्यांनी अशाप्रकारची जागा मालवणसाठी उपलब्ध करून का दिली नाही? आणि जागा देण्याचे दातृत्व नसेल तर स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी आवश्यक असणार निधी का उपलब्ध करून दिला नाही? निधी दिला असता तर आम्हीही सत्कार केला असता. मात्र विकास

निधी न देता केवळ आरोप करण्याचे काम आमदार व केणी करत आहे. विकास कामे अपूर्ण असले बाबत आमदार आता प्रश्न उपस्थित करत आहेत, मग गेली आठ वर्षे आमदार गप्प का बसले होते? असाही सवाल कुशे यांनी केला आहे. ज्या संस्थेने नाममात्र वार्षिक शंभर रूपये भाड्याने ९९ वर्षांसाठी ६२ गुंठे जागा शहरातील मुलांच्या हितासाठी दिली होती, त्याच संस्थेवर कारवाई करण्यासाठी केणी आणि आमदार वैभव नाईक प्रशासनावर दबाव आणत असतील तर आम्ही एकून घेणार नाही, असेही श्री. कुशे म्हणाले. जर आमदारांनी निधी उपलब्ध करून दिला असता तर ही वेळ आली नसती असेही श्री. कुशे म्हणाले आहेत.

 

केणींनी माहिती घेवून बोलावे

 

शिक्षण संस्थेने ज्या उदात्त हेतून आपली जागा दिली आहे, त्यांच्याबद्दल चुकीची माहिती समाजात पसरविण्याचे काम केले जात आहे, यापेक्षा संस्थेने स्पोर्टस् कॉम्प्लेक्सबाबत नगरपालिकेला दोन वेळा पत्रव्यवहार करून निर्णय घेण्याची विनंती केली आहे. दोन वर्षांची धर्मादाय आयुक्तांनी दिलेली परवानगी संपल्यानंतर भुमीपूजनाचा घाट उबाठाच्या नेत्यांनी घातला होता. त्याबाबत संस्थेने दिलेले पत्र पालिकेच्या दप्तरातून गायब करण्यात आले होते. यामध्येही केणी यांचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे. मुख्याधिकारी यांच्याकडे सदरचे पत्र पोहचलेलेच नव्हते. संबंधित संस्थेकडून स्पोर्टस कॉम्प्लेक्सबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. 22 तारिखला पालिकेत बैठक आहे. संबंधित संस्थेवर उबाठाचेही कार्यकर्ते असून त्यांच्याकडून केणी यांनी सविस्तर माहिती घेवूनच आमच्यावर टिका करावी, असाही टोला श्री. कुशे यांनी मारला आहे.

 

मांडीला मांडी लावून बसलेल्यामुळेच भाजी मंडई काम रखडले

 

भाजी मंडईचे बांधकाम त्याठिकाणी असलेल्या एका गाळ्या मुळे रखडले आहे, याबाबत पालिका प्रशासनाकडून माहिती घेणे आवश्यक होते. इतर दुकानदारांना – त्याठिकाणाहून विस्थापीत करण्यात आले होते. मात्र केणी यांच्या कालच्या उपोषणाला मांडीला मांडी – लावून बसलेल्या व्यक्ती पैकी असलेला दुकानगाळा वाचविण्यात आल्याने आज इतर बांधकाम रखडले आहे. यामुळे केणींनी उपोषण करताना त्यातील सर्व विषयांची माहिती घेवून उपोषणातून ठोस निर्णय होण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा पुन्हा उपोषण – करावे, असाही टोला श्री. कुशे यांनी मारला आहे.

 

स्थायी समितीच्या ठरावाच्या प्रती घेवून उबाठा सेनेचे प्रवक्ते मंदार केणी भाजपा नगरसेवकांवर टिका करत आहेत. मात्र स्थायी समितीच्या ठरावाला पालिकेच्या सभागृहात मान्यता दिली जात असताना केणी मुग गिळून गप्प का बसले होते? आमचा ठराव योग्य नव्हता, तर मग जिल्हाधिकारी यांच्याकडे सदरचा ठराव रद्द करण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत? स्पोर्टस् कॉम्प्लेक्सच्या कामाला दोन वर्षांची मुदत असताना सदरचे काम पूर्ण करण्यासाठी केणी यांनी का प्रयत्न केले नाहीत? असा सवाल उपस्थित करत भाजपाचे माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी मंदार केणी यांच्या उपोषणाचा स्टंट हा निव्वळ स्पोर्टस कॉप्लेक्सच्या ठेकेदाराला वाचविण्यासाठीच होता असा आरोप केला आहे.

 

भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कुशे बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेक, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर, पंकज सादये, संचालक आबा हडकर, ललित चव्हाण, पूजा वेरलकर, नंदू देसाई, यशवंत मालंडकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.