शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप रस्त्याचे खड्डे भरले
स्थानिक लोकप्रतिनिधींची अकार्यक्षमता स्पष्ट; जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार
गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील तळवली शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप रस्त्याचे दुखणे गेली अनेक वर्षे संपल्या संपत नसल्याने प्रवासी व वाहनचालक अक्षरश: हैराण झाले आहेत. मात्र नुकतेच ज्येष्ठ निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी तथा नारायण धर्माधिकारी यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड यांच्यामार्फत व पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून व श्री सदस्य बैठक तळवली यांच्या माध्यमातून या रस्त्याची साफसफाई व खड्डे भरले. रविवार, 18 रोजी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे प्रवासी व वाहनचालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
श्री सदस्य बैठक तळवली मार्फत सकाळी 7.30 वाजल्यापासून कामाला सुरुवात करून या रस्त्याची साफसफाई व रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम पूर्णत्वास नेले. यामुळे येथील प्रवासी व वाहनचालक, ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. तर यातून स्थानिक लोकप्रतिनिधींची अकार्यक्षमता दिसून येत असून येथील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याची चर्चा सध्या तळवली आदी परिसरात सुरू आहे.











