दुर्मिळ १५१ वनौषधींची लागवड : मेढा येथील श्री. सदस्यांचा जि.प. प्राथमिक शाळा साळेल नं. १ येथे उपक्रम
अमित खोत | मालवण : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यावतीने मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा साळेल क्रमांक एक येथे दुर्मिळ अशा १५१ वनौषधींच्या झाडांची लागवड श्री सदस्यांच्या वतीने करण्यात आली.
मालवण शहरातील मेढा येथील श्री बैठक मधील १२० श्री सदस्यांनी सफेद सावर, सप्तरंगी, कैलासपती, लालचंदन, कापूर, लक्ष्मीतरु, बहावा, आपटा, सीताअशोक, करंजा, धूप, कडुलिंब, नाना, बेल, पाडळ, चंदन, टेटू, पुत्रांजली, सीमारोप, आवळा, अर्जुन, कदंबा, कांचन, जांभूळ, लिंबू, औदुंबर, नरक्या, नरवेल, हाडसांदी, अश्वगंधा, सुरपीन अशा १५१ दुर्मिळ वनौषधींची लागवड जिल्हा परिषद शाळा साळेल क्रमांक एक येथे केली. या झाडांचा संरक्षणासाठी चार फूट उंचीचे फायबर नेट लावण्यात आले. यावेळी साळेल ग्रामपंचायत सरपंच रवींद्र साळकर व शिपाई गणेश गावडे उपस्थित होते. ही झाडे कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने पर्यावरणाचे रक्षण संवर्धनासाठी पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगड भूषण डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बैठकीच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरण पूरक असे विविध उपक्रम जिल्हा, राज्य, देश पातळीवर राबवले जातात. यात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, अधिवास दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यालाच अनुसरून गेली पंधरा वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हजारो वृक्ष लागवड व संवर्धन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली व त्याचे पाच ते सहा वर्षे संगोपन करून सरकारला ती हस्तांतरित करण्यात आली.












