तालुक्यातील विविध संघटनांची तहसीलदारांमार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता लोकसभा, विधानसभा, विधान परिषद यांना निवेदने सादर
*गुहागर l प्रतिनिधी:* दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी SC, ST आरक्षणासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय घटनाबाह्य असून तो लागू करू नये, यासाठी गुहागर तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय संघटनांनी गुहागर तहसीलदार यांचेमार्फत मा. पंतप्रधान, मुख्यमंत्री महा.राज्य, विरोधी पक्ष नेता लोकसभा, विधानसभा व विधान परिषद यांना निवेदने सादर केली. यावेळी समता सैनिक दल गुहागर, चर्मकार विकास मंडळ गुहागर, सामाजिक विकास केंद्र गुहागर, बौद्धजन सहकारी संघ गुहागर, बौद्धजन पंचायत समिती गुहागर, बहुजन समाज पार्टी गुहागर, वंचित बहुजन आघाडी गुहागर या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, सदर निकाल भारतातील 1100 पेक्षा अधिक व महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींच्या संवैधानिक हक्क व अधिकारांवर दूरगामी परिणाम घडवून आणणारा आहे. या निकालात अनुसूचित जातींचे उपगट करण्याचा दिलेला आदेश हा भारतीय संविधानातील तरतुदींचा भंग करणारा आहे. संविधानातील अनुच्छेद 341 हे अनुसूचित जातींचे क्रीमी लेयर वर आधारित उप गटात विभाजन करण्यास मनाई करीत असतानाही विभाजनाचा अट्टाहास न्यायालयाने निकालपत्रात धरल्यामुळे तो निकालच संविधानातील तरतुदींचा भंग करीत आहे. सदर निकालामुळे सामाजिक समता प्रस्थापनेचा संविधानाचा मूळ हेतू संपुष्टात येत आहे व त्याला न्यायालयाकरवी बळकटी दिली जात आहे. मा. सर्वोच्च न्यायालयासमोर आलेल्या प्रश्नांची कक्षा ओलांडून जो प्रश्न त्यांच्यासमोर आलाच नव्हता त्यावरही निकाल देऊन न्यायालय मोकळे झाले आहे. अशाप्रकारे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देणे हे अनाकलनीय आहे. म्हणून आरक्षणातील आरक्षण या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत देशभर शंका निर्माण झाली आहे. तसेच निकाल पत्रातील काही नोंदी अत्यंत आक्षेपार्ह आहेत. म्हणून केंद्रीय स्तरावर सदरच्या आदेशाची अंमलबजावणी करू नये, अशा प्रकारच्या मागणीचे निवेदने तालुक्यातील विविध संघटनांनी सादर केली आहेत. त्याचबरोबर सदरील निर्णयामध्ये बदल झाला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक विकास केंद्राचे अध्यक्ष प्रमोद पवार, समता सैनिक दल गुहागरचे अध्यक्ष उत्तम पवार, बौद्धजन सहकारी संघ गुहागर व वंचित बहुजन आघाडी गुहागरचे अध्यक्ष सुनील जाधव (माजी सैनिक), बौद्धजन पंचायत समितीचे विशाल सावंत, बहुजन समाज पार्टी गुहागरचे अध्यक्ष उमेश पवार, सखाराम पवार, महेंद्र कदम, ॲड. दिनेश कदम, अमित पवार, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव भूषण पवार, मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ जाधव (गुरुजी), चर्मकार विकास मंडळ गुहागरचे अध्यक्ष विजय जानवळकर, सचिव संतोष पालशेतकर, विनोद जानवळकर, अशोक जानवळकर आधी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.












