काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचे कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र
लांजा( प्रतिनिधी) लांजा तालुक्यातील कोत्रेवाडी
येथील घनकचरा प्रकल्प (डम्पिंग ग्राउंड) रद्द करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी केली असून याबाबतचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना सादर केले आहे .
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लांजा तालुक्यातील कोत्रेवाडी येथे लांजा नगर पंचायतीकडून भर वस्तीजवळ डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यामुळे येथील रहिवासी यांनी आपल्या काँग्रेस पक्षाकडे डम्पिंग ग्राउंड बाबत तक्रार केली आहे. सदर जागा ही लोकवस्ती पासून जवळ असून त्यांच्या आरोग्याला धोका संभवतो आहे. जिल्हा निवड समितीने सुद्धा सदर जागा घेण्यास विरोध दर्शवला होता.
त्याचप्रमाणे सदर जागा न्यायप्रविष्ठ असताना सुद्धा नगरपंचायतीकडून खरेदी करण्यात आलेली आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे याची सखोल चौकशी करून लवकरात लवकर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अविनाश लाड यांनी या पत्राद्वारे केली आहे.











