मुंबई : नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आज पहाटे ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. खासदार वसंत चव्हाण यांना गेल्या काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळं त्यांना नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यानं पुढील उपचारासाठी हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळं नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली.
*वसंत चव्हाण यांची राजकीय कारकीर्द*
वसंत चव्हाण यांची राजकीय कारकीर्द १९७८ साली सुरु झाली होता. ते सर्वप्रथम नायगाव या गावचे सरपंच बनले होते. त्यानंतर २००२ साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती, त्यानंतर १६ वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. अलिकडेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वसंत चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा पराभव केला होता.












