खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील बहिरवली नं.१ येथे भक्ष्याच्या शोधात शनिवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. काही ग्रामस्थांच्या दृष्टीस बिबट्या पडताच भीतीने थरकापच उडाला.
या बाबत वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी गावात पोहचून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्या अन्यत्र पसार झाला. भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. ग्रामस्थांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत वनविभागाने सूचित केले आहे. मुक्या प्राण्यांना बाहेर न सोडता सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनीच काळजी घेण्याचे आवाहन वनपाल सुरेश उपरे यांनी केले आहे. ग्रामस्थ भीतीच्या सावटाखालीच वावरत असून वनविभागाने तातडीने बिबट्याचा शोध घेण्याची मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.












