संतोष वायंगणकर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि तमाम हिंदूची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी राजेंच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा सोमवार २६ ऑगस्टला कोसळला. या दुर्दैवी घटनेने अखंड महाराष्ट्राला निश्चितच वेदना झाल्या आणि संतापही आला.
४ डिसेंबर २०२३ रोजी मालवण शहराजवळील राजकोट किल्ल्यावर नौदलदिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याच्या उभारणीला आठ महिन्यांचा कालावधी झाला आहे. छत्रपती शिवाजी राजेंचा पुतळा कोसळल्यानंतर त्याचे तिव्र पडसाद उमटणे सहाजिकच होत.
छत्रपती शिवाजी राजे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. शिवकालाला साडेतीनशे वर्षे होऊन गेलीत. परंतु या साडेतीनशे वर्षापूर्वीच्या छत्रपतींचाकाळातील त्यांच्या शौर्याच्या, पराक्रमाच्या आणि गणिमी काव्याच्या गोष्टी ऐकताना शिवप्रेमीना रोमांचित व्हायला होतं. छत्रपती शिवाजी राजे यांच्याशी आपण सर्वच इतके जोडले गेलेलो आहोत की शिवराय हे आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भागच बनून गेले आहेत. यामुळे त्यांच्यासंबंधी कोणतीही घटना ही आपणाला आपल्या फार जिव्हारी लागते.
यामुळे राजकोट किल्ल्यावरील उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा उभा राहिला तेव्हा निश्चितच सर्वांनाच आनंद झाला. त्या पुतळा उभारणीचे कौतुकही झाले. ४ डिसेंबर २०२३ पासून गेल्या आठ महिन्यात हजारो पर्यटकांनी या शिवपुतळयाचे दर्शन घेऊन या शिवपुतळयाला नतमस्तकही झाले.
मात्र, २६ ऑगस्टला दुपारी १२.३० वाजता शिवपुतळा कोसळला तेव्हा आपल्या शरीराचा एक भाग गळून पडला की काय असं वाटण्याजोगी स्थिती निर्माण झाली. छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षियांकडून त्यांच्या-त्यांच्या राजकीय पद्धतीनुसार प्रतिक्रिया दिल्या गेल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे मुंबई-गोवा महामार्गाच्या पहाणी दौऱ्यानिमित्त कोकणातच होते. त्यांच्यासोबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाणही या दौऱ्यात होते. मात्र, सोमवारी सायंकाळीच ना. रविंद्र चव्हाण मालवणमध्ये दाखल झाले.
राजकोटची पहाणी केली आणि दोषींवर गुन्हेही दाखल झाले. रात्रौ उशिरापर्यंत ही प्रक्रिया मालवण पोलिस स्टेशनला सुरू होती. राजकोटमधील हा पुतळा नौदलातर्फे उभारण्यात आला होता असे सांगितले जात आहे. हा पुतळा उभारणारे शिल्पकार जयदिप आपटे आणि कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिवपुतळयाच्या कोसळण्यामागे कितीही आणि कोणतीही कारण असलीतरी देखिल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना कोणत्याही त्रुटी, दोष रहाता कामा नयेत. त्याची काळजी घेणे आवश्यक होते. हे निश्चितच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सोशल मिडिया, माध्यमांवर प्रतिक्रिया उमटणे सहाजिकच आहे. त्याप्रमाणे त्या प्रतिक्रिया व्यक्तही केल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचा दाखला देण्यात आला. छत्रपती शिवरायांचा तो काळ, त्यावेळच वास्तुशास्त्र, वास्तु रचनाकार आणि बांधकामांतील कुशल कारागिरी याच्या फक्त त्या काळातील वास्तुंकडे पहात आपण नतमस्तक होणे एवढच आपल्या हाती आहे. आज उभी रहाणारी बांधकाम, बांधले जाणारे रस्ते यांचा कार्यकाळ आपल्यासमोरच असतो. यामुळे ती तुलना देखिल अनाकलनिय आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची उभारणी करताना घ्यावयाची काळजी किनारपट्टीवरील हवामान, वातावरणातील बदल या सर्वबाबतीत यापुढच्याकाळात उभ्या होणाऱ्या पुतळयाच्याबाबतीत भविष्यकालिन विचार करून एक देखण स्मारक उभं रहावं.
शेवटी छ.शिवाजी महाराज हा काही राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. तर तो महाराष्ट्राच्या आणि तमाम शिवप्रेमींच्या अस्मितेचा तो विषय आहे. शिवपुतळयाच्याबाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनेने शिवप्रेमींना निश्चितच वेदना झालेल्या आहेतच शेवटी सर्वांच्या हा अस्मितेचा भावनिकतेचा विषय आहे.









