मंडणगडात ओमसाई गोविंदा पथकाचा सहा थरांचा थरार

श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोविंदा निमीत्त तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन –

मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड शहरात युवासेना, शहरशिवसेना, भारतीय जनता पार्टी, व्यापारी संघटना यांच्या माध्यमातून सार्वजनीक दहीहांड्या उभ्या करण्यात आल्या होत्या या निमीत्ताने जागोजागी डि.जे. व मनोजरंजाने कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजीत होत असताना उंचच उंच मनोऱ्यांचा थरार व भव्य दिव्य आयोजन युवकांना आकर्षित करित असल्याने उंच दहीहंड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. शहरातील ओमसाई गोविंदा पथकाने दापोली फाटा येथील युवा सेनेच्या हंडीला सहा थरांची सलामी दिली. दरम्यान शहरातील दहीहांडी फोडण्याचे कार्यक्रम रात्री उशीरा सुरु होता.

 

 

श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला व गोविंदा दहीकाला उत्सव तालुक्यात शांततेत संपन्न झाला. बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे हद्दीत 2 सार्वजनीक व 389 खाजगी दहीहांड्या उभ्या करण्यात आल्या होत्या तर मंडणगड पोलीस स्थानकाचे हद्दीत 12 सार्वजनीक व 122 खाजगी दहीहांड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. गावागावातील गोविंदानी गोविंदाचा गोपाळाच्या जयघोषात हांडी फोडून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला. शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागात सोमवारी रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे निमीत्ताने विविध ठिकाणी सार्वजनीक खाजगी कार्यक्रमाचे मोठ्या भक्तीमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. तर मंगळवारी तालुक्यात 525 ठिकाणी दही हांड्या उभ्या करण्यात आल्या होत्या.