सजावटीसाठीच्या साहित्याने सजली बाजारपेठ
गणेशोत्सव ; साहित्य खरेदीसाठी होतेय गर्दी
चिपळूण (संतोष सावर्डेकर):-– गणेशोत्सवास काही दिवस शिल्लक असल्याने आतापासून गणेशभक्त गणपती सजावटीसाठी साहित्य खरेदी करत आहेत. बाजारपेठादेखील सजावट साहित्यांनी फुलून गेल्या आहेत. यामध्ये वैविध्यपूर्ण आकर्षक कृत्रिम फुलांच्या माळा व तोरण, झिरमिळ्या, रिमझिम, लॉन, फुले आणि कमानी, कुंदन टिकल्यांचा वापर केलेले झुंबर असे विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. चिपळूण बाजारपेठेसह डीबीजे महाविद्यालयासमोर देखील साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे.
यंदा ७ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे. गणरायाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त आसुसला आहे. तत्पूर्वी घराला रंगरंगोटी दिली जात आहे. घरासह परिसर स्वच्छ केला जात आहे. तर दुसरीकडे गणेशोत्सव सजावटीसाठी गणेशभक्तांकडून नियोजन केले जात आहे. तर त्या दृष्टीने गणेश सजावटीचे साहित्य देखील चिपळूण बाजारपेठेत आले आहे.
यामध्ये गणेशोत्सवासाठी आकर्षक अशा फुलांच्या माळा आल्या आहेत. दुकानाबाहेर लटकवलेल्या या रंगबेरंगी फुलांच्या माळा या नागरिकांना आकर्षित करत आहेत. यामध्ये मणी आणि रंगीत धाग्यांनी बनवलेल्या माळांचादेखील समावेश आहे. काही कापडाचे विविध आकार कापून रंगीत धाग्यांमध्ये बनवलेल्या माळादेखील आहेत. विविध रंगांतील झिरमिळ्या व लॉन सजावट साहित्यात मागे किंवा जमिनीवर लावण्यात येणारे आणि गवतासारखे दिसणारे प्लास्टिकचे लॉन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सजावट अधिक आकर्षक आणि भरीव दिसावी यासाठी विविध रंगातील झिरमिळ्या उपलब्ध आहेत. क्रिस्टल लाकडी, रेशीम, सुती धाग्यातील लटकन बाजारात सजावटीसाठी उपलब्ध आहेत. सोनेरी आणि चंदेरी रंगातील क्रिस्ट वेलचे लटकन विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. रंगीत रेशीम, सुती व क्रिस्टल बेलचे लटकन उपलब्ध आहेत. लाकडापासून बनवण्यात आलेले नवीन प्रकारचे लटकन विक्रीस उपलब्ध आहेत. विविध रंगातील फुले आणि कमानी, विविध रंगातील प्लास्टिकची फुले विक्रीस उपलब्ध आहेत. विक्रेत्यांकडून ग्राहकांच्या आवडीनुसार मखरासाठी लागणारी फुलांची कमान बनवून दिली जात आहे. कुंडी व रिमझिम देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गणेश सजावट साहित्य गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
गणेशोत्सव सजावट साहित्याच्या व्हरायटीज उपलब्ध-शिल्पकार
उत्तर प्रदेश लखनौ येथील मुनू शिल्पकार हा आपल्या कुटूंबियांसह गेली १५ ते २० वर्षे चिपळूणमध्ये गणेश सजावट साहित्य विक्रीचा व्यवसाय करीत आहे. दिल्ली येथून सुटा माल आणून माळ, तोरण, रिमझिम, कुंडी यासारखे साहित्य तयार करून विक्री करीत आहे. येथील गणेशभक्त गणेशोत्सव सजावटीसाठी आग्रही असतो. यामुळे आमच्या या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळतो, अशी भावना व्यक्त करतांना यावर्षी देखील गणेशोत्सव सजावटीच्या विविध व्हरायटीज डीबीजे महाविद्यालयासमोर विक्रीसाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती शिल्पकार यांनी दिली.










