सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मॅनेजर आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

देवगड / प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुणगे शाखा व्यवस्थापक अविनाश काशिराम तळवडेकर (रा. आरे बौद्धवाडी) यांच्या आत्महत्येप्रकरणी सुहास नारायण मालंडकर (वय ६०, रा. देवगड पवनचक्की) व अमोल नंदकिशोर कांदळगावकर (३५, रा. देवगड) या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मृत अविनाश तळवडेकर यांची पत्नी सुनीता अविनाश तळवडेकर (४३, रा. आरे बौद्धवाडी) यांनी दिली आहे. ही घटना २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वा. ते २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा. च्या कालावधीत घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनीता तळवडेकर यांचे पती अविनाश तळवडेकर हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुणगे शाखेमध्ये व्यवस्थापक पदावर नोकरीस होते. नोकरीनिमित्त ते मुणगे आडबंदर येथे राहायला होते. ते २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता नियमितपणे बँकेत जाण्यासाठी गेले. ते सायंकाळी ६ वा. पर्यंत घरी न आल्याने सुनीता तळवडेकर यांनी अविनाश यांच्या मोबाईलवर फोन केला असता त्यांचे दोन्ही मोबाईल नंबर बंद असल्याचे आढळले. त्यामुळे सुनीता यांनी हिंदळे येथील जिल्हा बँकेचे मॅनेजर मकरंद सक्रु यांना फोन करून खात्री केली असता त्यांनी अविनाश हे मुणगे येथील बँकेचे शिपाई श्री. चिंबे यांना आपण देवगड येथे जातो, असे सांगितले. परंतु अविनाश हे घरी गेले नसल्याने सुनीता व त्यांच्या नातेवाईकांनी इतरत्र शोध घेतला असता ते कुठेही सापडले नाहीत. दरम्यान, अविनाश तळवडेकर यांची मोटारसायकल (एम ०७, एटी ०३०२) ही आरे जेठेवाडी येथे कौल कारखान्यानजीक मिळून आली. त्या मोटारसायकलच्या डीकीमध्ये अविनाश तळवडेकर यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. यावेळी त्यांचा कौल कारखान्यानजीक परिसरात शोध घेतला असता ते कोठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे सुनीता तळवडेकर यांनी देवगड पोलीस स्थानकात अविनाश तळवडेकर हे बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा. च्या सुमारास आरे जेठेवाडी कौल कारखान्यानजीकच्या तळ्यातील पाण्यात अविनाश तळवडेकर यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली. दरम्यान, मृत अविनाश तळवडेकर यांनी संशयित सुहास मालंडकर व अमोल कांदळगावकर यांना मोठ्या स्वरुपाची दिलेली रक्कम संशयितांनी परत केली नव्हती. त्यामुळे अविनाश तळवडेकर यांनी आत्महत्या केल्याचे सुनीता तळवडेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार दोन्ही संशयितांविरुदद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३ (५) अन्वये देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ करीत आहेत.