भाजपा पदाधिकाऱ्यांनी वेधले वीज अधिकाऱ्यांचे लक्ष : विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील स्ट्रीट लाईट व्यवस्थेसाठी स्वतंत्र लाईनमन नियुक्ती मिळावी, कमी दाबाचा वीज पुरवठा, नवीन ट्रान्सफार्मर, हंगामी व्यवसाय करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वीज मीटर मिळणे अश्या विविध मागण्याबाबत भाजपा पदाधिकारी यांनी शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या नेतृत्वाखाली वीज अधिकारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली.
गणेश उत्सव काळात मालवण शहरातील बंद स्ट्रीट लाईट बदलून नवीन बसवण्याची व्यवस्था नगरपरिषद माध्यमातून त्वरित केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र विद्युत मंडळ मालवण शहर कार्यालयातून विद्युत लाईन बंद तसेच पुन्हा चालू करण्यासाठी लाईनमन नियुक्त करावा. मालवण शहरातील कमी दाबाची वीज समस्या सुटण्यासाठी ट्रान्सफार्मर मिळावेत. गणेश उत्सव काळात वीज पुरवठा विनाखंडित सुरळीत होण्यासाठी तसेच किनारपट्टीवर पर्यटन कालावधीत हंगामी व्यवसाय करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात लाईट मीटर मिळणे यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे तसेच शहर अभियंता मयेकर यांच्याशी चर्चा करण्यात आली.
दरम्यान, वीज समस्या सोडवताना आपले पूर्ण सहकार्य राहील. स्ट्रीट लाईट साठी त्वरित लाईनमन नियुक्त केला जाईल. तसेच शहरासाठी लो होल्टेज समस्या सुटण्यासाठी शहरामध्ये 4 ट्रांसफार्मर वरिष्ठ स्तरावर प्रस्तावित केले आहेत. किनारपट्टीवर तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करण्यासाठी लाईट मीटर कनेक्शन देण्याचे साठी साकारत्मकता दर्शवण्यात आली.
यावेळी भाजपा मालवण शहर अध्यक्ष विष्णू मोंडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजन वराडकर, जगदीश गावकर, जयमाला मयेकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवामोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, कमलेश कोचरेकर, नंदू देसाई, मुन्ना फाटक, दत्तात्रय केळुसकर, किशोर खानोलकर, राज कांदळकर, रमाकांत फाटक यांसह पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.












