कल्पना कॉलेज मध्ये मोदक प्रदर्शन संपन्न, विद्यार्थ्यांनी सादर केले अनेक मोदकांचे प्रकार

 

लांजा (प्रतिनिधी) गणेशोत्सवाचे औचित्य साधून
कल्पना कॉलेज लांजामध्ये सोमवारी मोदक प्रदर्शन पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी कमी वेळेत आणि कमी खर्चात होणारे विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण, मोदक सादर केले.
कोकणात गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे, यावेळी प्रत्येकाच्या घरात गणेशाचं आगमन होत असून देवाला आवडणारा मोदक नैवेद्य म्हणून दाखवला जातो, या मोदकांचे अनेक प्रकार असून उकडीचे मोदक सर्व परिचित आहेत.पण याही पेक्षा अगदी कमी वेळेत आणि रुचकर चवीचे मोदक विविध पदार्थांचा वापर करून मोदक बनवता येऊ शकतात. याची माहिती विद्यार्थी आणि गणेशभक्तांना व्हावी या हेतूने हे प्रदर्शन ठेवण्यात आले होते.

 

 

मुख्यतः हॉटेल मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत काजू, खोबरे, पोहे, गुलकंद, पान, चॉकलेट बिस्कीट, बेसन, दुध, नाचणी पीठ, खवा, आमरस आणि सुका मेवा यांचा वापर करत अनेक मोदकांचे प्रकार बनवून सादर केले.
या प्रदर्शनाला पन्हळे येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली तसेच लांज्यातील अनेक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.