चाकरमान्यांचे हाल – चौपदरीकरणाच्या अर्धवट कामाचा फटका

खेड(प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई – गोवा महामार्गावर वाहनांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. भरणे नाका परिसरात तर गुरुवार सकाळपासून वाहतूककोंडी निर्माण झाली असून याठिकाणी पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाल्या

. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई सह पुणेकर मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. मुंबई – गोवा मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी वाहने वळवण्यात आलेली आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. यातून मार्ग काढताना वाहन चालकांची पुरती दमछाक होत आहे. रामवाडी, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड या दरम्यान महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत असून खेड वरील भरणे नाक्या नजीक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली

ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कशेडी टॅप च्या वाहतूक पोलीस व खेड येथील येथील पोलीस प्रशासनाने ही कोंडी सोडवण्यासाठी महामार्गावर अधिक पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.
या काळात अवजड वाहनांना काही काळासाठी जरी बंदी केली असली तरी देखील महामार्गाच्या झालेल्या या अर्धवट कामामूळे ही वाहतूक कोंडी झाली आहे.

 

चौकट :

महामार्गावरील आरवली ते संगमेश्वर यादरम्यान देखील मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे. सोमेश्वर आरवलीदरम्यान देखील महामार्गाचे काम अर्धवट आहे. या अर्धवट कामाचा फटका गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बसलेला दिसून येत आहे.