एस एम प्रशालेमध्ये शिक्षक दिनी विद्यार्थी शिक्षक दिन उत्साहात संपन्न

 

पाच सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती थोरतत्वचिंतक आणि आदर्श शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून एस.एम. ज्युनिअर प्रशालेमध्ये विद्यार्थी शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री डी एम नलावडे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. जी एन बोडके, सर्व शिक्षक व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.

ज्युनिअर कॉलेजमधील सायन्स, कॉमर्स, व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील विद्यार्थ्यांनी विषय शिक्षकांची भूमिका अत्यंत जबाबदारीने पार पाडली. त्याबरोबरच प्राचार्य, उपप्राचार्य , पर्यवेक्षक म्हणून कु.रमण मेस्त्री,कु पूजा मेस्त्री, कु.दीक्षा मेस्त्री यांनी प्रशासकीय भूमिका पार पाडली.

समारोप समारंभामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दलची आत्मीयता, त्यांचा त्याग, कामावरील निष्ठा आणि विद्यार्थ्यांवर ज्ञान संस्कार करत असताना घ्यावे लागणारे कष्ट यांची जाणीव झाल्याचे प्रतिपादन केले. प्रत्येक वर्गातून उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये भूषण मेस्त्री, पार्थ सावंत, पूर्वा घाडी,विपुल गावकर, मृणाली लांबार या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सौ.पाटील मॅडम यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे कार्य यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्राचार्य बोडके सर यांनी आपल्या मनोगतांमध्ये विद्यार्थ्यांनी आदर्श शिक्षक नाही झाले तरी चालेल पण भविष्यात आदर्श नागरिक व्हा असा मोलाचा सल्ला दिला त्याबरोबरच आज समाजात घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे पहावे आणि आपण सजगपणे जगावे अशीही अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतामध्ये सचिव श्री डी एम नलावडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. एका दिवसासाठी तुम्ही घेतलेली मेहनत आणि वर्षभर शिक्षक घेत असणारी मेहनत याबद्दलची जाणीव विद्यार्थ्यांना करून देत विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करण्याचा, त्यांच्या शिकवणीचा, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून आयुष्य घडवण्याचा मोलाचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मृणाली लांबर हिने तर आभार प्रदर्शन श्री सी.डी नलावडे यांनी व्यक्त केले.