१२ ते १८ सप्टेंबर काळात सुटणार २३१ जादा गाडया
१४ सप्टेंबर रोजी सर्वाधिक ९१ जादा गाडया सुटणार
राजापूर l प्रतिनिधी : गणेशोत्सवासाठी तालुक्यात दाखल झालेल्या मुंबईकर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाठी राजापूर आगार सज्ज झाले आहे. परतीच्या प्रवासाठी राजापूर आगारातुन मुंबई, ठाणे, बोरिवली, नालासोपारा या मार्गावर १२ ते १८ सप्टेंबर या कालावधीत तब्बल २३१ जादा गाडयांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. तशी माहिती आगार प्रमुख अजितकुमार घोसराडे यांनी दिली आहे.
गणेशोत्सवासाठी तालुक्यात मोठया प्रमाणावर मुंबईकर चाकरमांनी दाखल झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागात गणेशोत्सवासाठी आलेल्या या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाठी राजापूर आगाराच्या वतीने सुयोग्य असे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाईन तसेच ग्रुप बुकिंग आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याचा प्रवाशांनी चांगला लाभ घेतला असून १२ ते १८ सप्टेंबर काळात २३१ जादा गाडया आरक्षित झाल्या आहेत. मुंबई, ठाणे, बोरिवली, नालासोपारा या मार्गावर या गाडया आरक्षित झाल्या आहेत. यामध्ये १२ रोजी २, १३ रोजी ६५, १४ रोजी सर्वाधिक ९१, १५ रोजी ४०, १६ रोजी १२, १७ रोजी १०, १८ रोजी ११ अशा एकूण २३१ गाडया आरक्षित झाल्या आहेत. तर नियमित बोरिवली, नालासोपारा व मुंबई गाडया या त्या वेळेत सुटणार आहेत.
यासाठी आगार प्रमुख अजितकुमार घोसराडे, स्थानक प्रमुख सचिन मोरे. तांत्रिक कार्यशाळा अधिक्षक प्रकाश झोरे यांसह सर्व अधिकारी व कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत.











