बसणी येथे भीषण अपघात

 

 

दुचाकीला सुमोची जबरदस्त धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधी :तालुक्यातील बसणी येथील पहिल्याच वळणात भरधाव सुमोने दुचाकीला समोरुन धडक देत अपघात केला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असून धडक दिल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढलेला सुमो चालक केतन नवल कोदे (20,रा.देवगड,सिंधुदुर्ग) याला ग्रामीण पोलिसांनी काही वेळातच कोतवडे येथून ताब्यात घेतले. अपघाताची ही घटना शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा. सुमारास घडली.

सौरभ मधुकर काजरेकर (25,रा.पाली डोंगरवाडी,रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेली वृषाली जगदीश धाडवे (21,रा.उमरे चांदेराई,रत्नागिरी) ही तरुणी किरकोळ जखमी झालेली असून तिच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी दुपारी सौरभ काजरेकर आपल्या ताब्यातील दुचाकी पॅशन प्रो (एमएच-08-वाय-8562) वर पाठीमागे वृषाली धाडवे हिला बसवून बसणी ते रत्नागिरी असा येत होता. त्याच सुमारास केतन कोदे हा आपल्या ताब्यातील सुमो (एमएच-03-बीएस-9181) घेउन रत्नागिरी ते गणपतीपुळेच्या दिशेने जात होता. बसणी येथील वळणात केतनने भरधाव वेगाने सुमो चालवत सौरभच्या दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. सौरभच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर केतनने न थांबता तिथ्ाून पळ काढला. या धडकेत सौरभ गंभिर जखमी झाल्याने तेथील स्थानिकांनी रिक्षेतून सौरभ आणि वृषालीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सौरभला तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली होती. ग्रामीण पोलिस सुमो चालकाचा शोध घेत असताना त्यांना कोतवडे येथून पोलिसांनी सुमो चालक केतनला सुमोसह ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.