खेड-पनवेल अनारक्षित स्पेशलमुळे गणेशभक्तांची मिटली चिंता

 

खेड(प्रतिनिधी) गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने प्रथमच येथील रेल्वेस्थानकातून खेड-पनवेल अनारक्षित स्पेशलच्या सलग तीन दिवस सहा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतल्याने तीनही तालुक्यातील गणेशभक्तांची मुंबई गाठण्याची चिंता काहीअंशी मिटली आहे. मात्र पहिल्याच दिवशी स्पेशलच्या फेरीला अत्यल्प प्रतिसाद लाभला.

०१०७४/०१०७१ क्रमांकाची शुक्रवारी सकाळी ६ वा. सुटलेली खेड-पनवेल अनारक्षित स्पेशल मार्गस्थ होवून पनवेल येथे सकाळी १० वा. पोहचली. १४ व १५ सप्टेंबर रोजी पनवेल येथून सकाळी ११ वा. सुटून दुपारी २.४५ वा. खेड स्थानकात पोहचेल. २० डब्यांच्या स्पेशलला कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापेवामणे, वीर, गोरेगाव, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण स्थानकांत थांबे आहेत. ०१०७२/०१०७३ क्रमांकाची शुक्रवारी दुपारी ३.१५ वा. सुटलेली खेड-पनवेल अनारक्षित स्पेशल पनवेल येथे रात्री ८.३० वा. पोहचली. १४ व १५ सप्टेंबर रोजी स्पेशल धावणार आहे. परतीच्या प्रवासात पनवेल येथून रात्री ९.१० वा. सुटून मध्यरात्री १ वा. येथील स्थानकात पोहचेल. १४ व १५ सप्टेंबर रोजी स्पेशल धावणार आहे.

पनवेल-खेड स्पेशललाही ४ तास ‘लेट

गणेशोत्सवातील गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी येथील स्थानकातून खेड-पनवेल अनारक्षित स्पेशलच्या शुक्रवारपासून फेऱ्या चालवण्यात येत आहेत. या फेऱ्यांमुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला असला तरी पहिल्याच दिवशी पनवेल-खेड अनारक्षित स्पेशलला ४ तास २० मिनिटे लेट धावली . येथील रेल्वेस्थानकात स्पेशलच्या प्रवाशांचा खोळंबा झाला. येथून दुपारी ३.१५ वाजता सुटणारी खेड-पनवेल स्पेशल सायंकाळी ५.१५ वाजता सुटल्याने प्रवाशी रखडले.