गावखडी/वार्ताहर : बालवाडी इमारत सेस फंड व ग्रामपंचायत मेर्वी यांच्या निधीतून बांधकाम करण्यात आले होते. परंतु सदर इमारत मोडकळीस आल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी उठाव करून तो सदरचा प्रस्ताव इमारत निर्लेपनासाठी पंचायत समिती बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला आहे. सदरची इमारत अत्यंत धोकादायक झाली आहे.
त्या इमारतीच्या ओसरीमध्ये जिल्हा परिषद मेर्वी गुरववाडी सेमी इंग्रजी शाळा भरत आहे. सदरच्या शाळेला अद्याप इमारत प्राप्त झालेली नाही. परंतु ग्रामपंचायत मेर्वी कडून इमारतीसाठी दिनांक 28/8/2024 रोजी शिक्षणाधिकारी(प्राथ) जिल्हा परिषद रत्नागिरी यांना प्रस्ताव पोच झाला आहे.तसेच महिला बालकल्याण अधिकारी यांच्याकडे सुद्धा अंगणवाडी इमारत प्रस्ताव दिनांक 24/7/2024 रोजी सादर केला आहे. परंतु त्याला केराची टोपली दाखवण्यात येत आहे.
पालकमंत्री यांच्याकडे दिनांक 1/12/2022 व दिनांक 22 /7/2024 रोजी मागणी अर्ज दिला होता. परंतु त्याकडे सुद्धा दुर्लक्ष का करण्यात आले आहे असा प्रश्न ग्रामस्थांना पडत आहे. तसेच सदरच्या शाळेला व अंगणवाडीला कोणीही वाली नाही.









