विरसई येथे जलकुंडाची बांधणी

दापोली | प्रतिनिधी : तालुक्यातील विरसई येथील शेतकऱ्यांसाठी जलकुंड बांधणी हा कृषी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम कृषीकन्यांनी घेतला. कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे ” वसुंधरा ” व ” कृषी नित्या ” गटाच्या विद्यार्थिनींनी हे प्रात्यक्षिक दाखविले. यासंदर्भात
प्रा. श्वेतातांबरी नगरकर आणि प्रा. डाॅ. सचिन पाठक यांनी मार्गदर्शन केले. जलकुंड पाणी साठवण, सिंचन, मत्स्यपालन आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपयोगी ठरते. विद्यार्थिनींनी स्थानिक समुदायांशी संवाद साधून, त्यांच्या गरजा आणि पसंती समजून घेतल्या. विद्यार्थिनींनी आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी पद्धतींचा वापर करून जलकुंडाची बांधणी अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बनवली. सदरील जलकुंडाचे आकारमान २ मी.× १ मी. × १ मी. एवढे आहे ज्याची पाणी साठवण क्षमता २००० लिटर इतकी आहे. संतोष कळवणकर यांच्या शेतावर या जलकुंडाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आले.
जलकुंड पाणी साठवून वर्षभर सिंचनासाठी उपलब्ध करून देते.

 

 

कुंडातील पाणी गरजेप्रमाणे शेतांना सिंचन करण्यासाठी वापरले जाते, ज्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते. या व्यतिरिक्त कुंडात मत्स्यपालन केले जाऊ शकते, ज्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळते. जलकुंड पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ते जैवविविधतेचे संरक्षण करते आणि वन्यजीवांना आश्रय देते. कृषीकन्यांच्या जलकुंड बांधणीच्या प्रयत्नामुळे स्थानिक समुदायांना अनेक फायदे मिळत आहेत आणि भविष्यात त्यांना पाण्याच्या टंचाईला कमी प्रमाणात सामोरे जावे लागेल. हा प्रकल्प कृषी क्षेत्रात सतत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणा देतो. या विद्यार्थिनींना कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. आनंद मयेकर, केंद्रप्रमुख डॉ. जगदीश कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे यांचे कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात मार्गदर्शन मिळाले.