शिवकालीन रस्ते शोधण्याचा प्रयत्न, खेडमधील सह्याद्रीचे कडे घालतायत साद
देवेंद्र जाधव/खेड : इतिहासकालीन दुर्ग, किल्ले यांच्याशी ट्रेकर्सचे अगदी जवळचे नाते आहे. त्यामुळेच याठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी कोकणातील राकट पर्वत रांगांपासून ते थेट सह्याद्रीच्या इतिहासाची यशोगाथा सांगणाऱ्या दुर्गापर्यंत जाणाऱ्या पायवाटांचे आकर्षण ट्रेकर्स मंडळींना आहे. या मुळेच कोकणात ट्रेकर्सची पावले आता घाट वाटा शोधून त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
१७ व्या शतकात २६० हून अधिक घाट वाटा वापरात होत्या. या घाटवाटांचे आकर्षण आजही ट्रेकर्सना आहे. छत्रपतींचे स्वराज्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने निघालेला औरंगजेब दक्षिणेत उतरला होता. तेव्हा त्याच्या एका सहकाऱ्याने सह्याद्रीचा अख्खा
नकाशा (ब्लू प्रिंट) मांडला होता. त्यावरूनच या घाटवाटा आजही ट्रेकर्सना आकर्षित करत आहेत.
२० व्या शतकात त्यातल्याच काही निवडक घाटवाटा कोकणाच्या रस्त्याला जोडल्या गेल्या आहेत. कशेडी, ताम्हीणी, माळशेज, कुंभार्ली, आंबोली, वरंद यासारखे जवळपास ५० हून अधिक मार्ग रस्त्यांनी जोडले आहेत. पण दोनशेहून अधिक घाटवाटा अजूनही रस्त्याने जोडलेल्या नाहीत. अगदी आजच्या काळातही वाहने जाऊ शकणार नाहीत. इतक्या वेगात आणि कमी वेळात घाटावरचा माणूस कोकणात किंवा कोकणातला माणूस घाटमाथ्यावर या घाटवाटांनी प्रवास करतो आहे. याचेच आकर्षण ट्रेकर्सना वाटते आहे. या करिता त्या घाटवाटा शोधण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येत आहे.
पावसाळ्यानंतर दाट धुक्याची शाल पांघरून थंडीचे आगमन होते. याच हंगामात अनेक साहसी तरूण सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात भटकंती करण्यासाठी सज्ज होतात. खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या मस्तकावर असलेल्या पर्वत रांगांवरील सह्याद्रीचे कडे सर करत त्यांच्या अंगाखांद्यांवर खेळण्यासाठी साहसी तरूण सज्ज होतात. पर्वत रांगांमधील सह्याद्रीच्या ताशीव कातळामध्ये असलेले दुर्गवैभव व सह्यकडे ट्रेकर्सना आता साद घालू लागले आहेत. किंबहुना खुणावू लागले आहेत. ट्रेकिंगचा आणि एकूणच भटकंतीचा खरा ‘माहोल’ सुरू झाल्याने किल्ले, मंदिर, लेणी, घाटवाटा, धुंडाळण्यासाठी भटक्यांची पावले सह्याद्रीकडे वळू लागली आहेत.
सह्याद्रीच्या पर्वत रागांमध्ये असलेले किल्ले रसाळगड, महिपतगड, सुमारगड, पालदुर्ग, किल्लेमाची, नागेश्वर,
महिमंडणगड, तर खेड सातारा मार्गावरील चकदेव, परबत या सारख्या अनेक ठिकानातील कठिण ट्रेक प्रसिद्ध आहेत. या ट्रेकवर पावसाळा व हिवाळा या कालावधीत ट्रेकर्स दाखल होण्याची संख्या अधिकच आहे. मात्र, तालुक्यातील पर्वत रांगांवर होणारे ट्रेक गेले अनेक वर्ष प्रसिद्धीच्या लखलखटापासून कोसो दूरच राहिले आहेत. दाखल होणारे ट्रेकर्स आपले ब्लॉग अथवा सोशल मीडियावर छायाचित्रांच्या माध्यमातून कोकणाच्या सह्य कड्यांचा उलगडा होणाऱ्या ट्रेकच्या माध्यमातून मांडत असतात.
कोकणात सुमारे शंभर हून अधिक ट्रेक प्रसिद्ध आहेत. त्यात सर्वाधिक ट्रेक खेड तालुक्यातील डोंगर रांगांवर पाहावयास मिळतात. अनेक समुह राकट पर्वत रांगा सर करून सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर एकप्रकारे खेळतच असतात. महाड ते खेड तालुक्यापर्यंत सह्याद्रीचा मोठ्या प्रमाणात असलेला विस्तार हा ट्रेकर्सना दरवर्षी आव्हानच देत असतो. तेच आव्हान पेलून अनेक ट्रेकर्स पर्वत रांगावर साहस व थरार अनुभवत पार करत असतात. काही ट्रेकर्स खरी भटकंती ही सह्याद्री खोऱ्यातच करावी याच मताचे असतात. त्यामुळे येथील इतिहासाच्या पाऊल खुणा जाणून घेण्याकरीता घाटमाथ्याला पसंती देतात
सर्वसामान्यांना घाट म्हटले की डोळ्यासमोर त्या दोन्ही बाजूंनी खोल-खोल जाणाऱ्या दऱ्या, चहू बाजूंनी वेढलेले डोंगर, वेडीवाकडी वळणे अन् काळा डांबरी सडक असेच काहीसे चित्र उभे राहते. मात्र सह्याद्रीच्या घाट मार्गे ट्रेक करणारे ट्रेकर्सच्या लेखी घाटाची परिभाषा मात्र वेगळी आहे. केवळ चालत इतिहासाच्या पाऊल खुणांची ओळख करून घेत ट्रेकर्स गत वैभवाच्या खुणा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात










