विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख व माजी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जि. प. च्या माजी सभापतींसह शेकडो जणांचा शिंदे गटात प्रवेश

राजापूर (प्रतिनिधी): राजापूरात मंगळवारी शिवसेनेने शिंदे गटाने उबाठा गटाला जोरदार दणका दिला आहे. गेली ३८ वर्षे कार्यरत असलेले विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख व माजी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर तसेच उबाठा गटाच्या माजी जिल्हा परिषद सभापती व महिला आघाडी संघटक सौ. दुर्वा तावडे, उपतालुका प्रमुख राजन कुवळेकर, जैतापूरचे माजी सरपंच गिरीश करगुटकर, माजी जि. प. सदस्या योगिता साळवी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह असंख्य राजापूर शहर तसेच ग्रामीण भागातील शेकडो शिवसैनिकांनी शिवसेना शिंदे गटात जाहिर प्रवेश केला. राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि रत्नसिंधू समृद्ध समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या उपस्थितीत या सर्वांना शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
विद्यमान निष्क्रीय आमदार राजन साळवी यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून आंम्ही मुळ शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे या पदाधिकारी व कार्यर्त्यांनी सांगितले.
या प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करताना तात्काळ यातील काहींना शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारीपदावर नियुक्त करण्याचे पत्र जिल्हा प्रमुख राहुल पंडीत यांच्या हस्ते देण्यात आले. शिवसेनेमध्ये तुम्हा सर्वांना मानाचे स्थान दिले जाईल. कोणाचीही परवड होणार नाही असा विश्वास यावेळी पालकमंत्री ना. सामंत यांनी या प्रवेशकर्त्याना दिला.
या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर प्रकाश कुवळेकर यांच्याकडे जिल्हा संघटक म्हणून तर अन्य काहींच्या संघटनात्मक पदी नियुक्ती करण्यात आल्या.
मागील काही महिन्यांपासून शिवसेनेने ( शिंदे गट ) उबाठा गटाला सातत्याने दणका देत आहे. आमदार राजन साळवी यांच्या मनमानीला कंटाळून अनेकजण पक्ष सोडून जात आहेत.
मंगळवारी मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा राजापुरात पार पडला. राजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजीत पक्ष प्रवेश सोहळ्याला राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, रत्न सिंधू समितीचे सदस्य किरण सामंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले, शहर प्रमुख सौरभ खडपे, तालुका संघटक भरत लाड, सौ. शुभांगी डबरे, माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, अर्बन बँक संचालक संजय ओगले यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या पक्षप्रवेशाने तालुक्यात उबाठाला मोठे खिंडार पडले आहे. राजापूर तालुक्यासह राजापूर शहरातील उबाठाच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यामध्ये उबाठाचे माजी तालुकाप्रमुख, राजापूर पंचायत समितीचे माजी सभापती आणि उबाठाचे विद्यमान विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुका प्रमुख राजन कुवळेकर, पाचलचे माजी विभागप्रमुख गणेश तावडे, माजी जि.प. सभापती आणि त्या पक्षाच्या विद्यमान महिला उपजिल्हाप्रमुख सौ. दुर्वा तावडे,कोदवली जि.प. गटाच्या माजी जि.प. सदस्या श्रीमती योगीता साळवी,जैतापूरचे माजी सरपंच गिरीश करगुटकर, संजना राऊत, किरण तुळसवडेकर, अंकुश ऐनारकर,जितेंद्र तुळसवडेकर यासह राजापूर तालुक्यातील उबाठा गटाच्या असंख्य आजी, माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.त्या सर्वांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले. दरम्यान शिवसेनेत जाहीर प्रवेश झाल्यानंतर प्रकाश कुवळेकर यांच्याकडे जिल्हा संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली असल्याची घोषणा करण्यात आली तर अन्य प्रवेशकर्त्या पदाधिकाऱ्यांना देखील शिवसेनेत अन्य पदी नियुक्त्यांची पत्रे देण्यात आली.











