आ. नितेश राणे यांच्यासह सकल हिंदू समाजाच्या अनेक वर्षांच्या मागणीला आले यश
रत्नागिरी | प्रतिनिधी
शहरातील खारेघाट रोड येथील शासकिय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर या सरकारी जागेत अतिक्रमण करत मजारसदृष्य बांधकाम केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे बांधकाम अनधिकृत आहे आणि ते हटवावे यासाठी सकल हिंदू समाजाच्या विविध संघटनांकडून अनेक वर्षे मागणी करण्यात येत होती. तर भाजपचे हिंदुत्ववादी नेते आ. नितेश राणे यांनीही काही दिवसांपूर्वी अशा अनधिकृत बांधकामांबाबत जिल्हधिकारी यांची भेट घेतली होती.
रत्नागिरी भाट्ये मार्गावर खारेघाट रोड येथील शासकिय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर या सरकारी जागेत मजारसदृश्य बांधकाम करण्यात आले होते. हि जागा सरकारी असूनही हळूहळू ती बळकावली जात होती. त्यात शासकिय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिराचे सरकारने नूतनीकरण केले होते. मात्र अनधिकृत असूनही या मजार सदृश्य बांधकामभोवती कंपाउंड वॉल केली नव्हती. याबाबत विविध हिंदू संघटनांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते तर याप्रकरणी सन २०१६ सालात तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी हि मजारसदृश्य बांधकाम अनधिकृत ठरवून ते हटवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. तरी काही दबावामुळे प्रशासनाकडून यावर कारवाई होत नव्हती. याप्रकरणी या आणि रत्नागिरीतील अशा अनधिकृत बांधकामांविरोधात हिंदू संघटनांनी मार्च २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तर भाजपचे नेते आ. नितेश राणे यांनीही अशा अनधिकृत बांधकामाबद्दल जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांची गेल्या महिन्यात भेट घेऊन रखडलेली कारवाई पूर्ण करण्याची तीव्र मागणी केली होती.
त्यानंतर तात्काळ कंपाउंड वॉलचे राहिलेले बांधकाम , बांधकाम विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आणि आत जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. आता याप्रकरणी झाकीर गुलाब सय्यद (56) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सन 1973 च्या पूर्वी ते दि.10 ऑक्टोबर 2024 या कालावधीत अज्ञाताने या सरकारी जागेत बेकायदेशिररित्या अतिक्रमण करत मजारसदृश्य बांधकाम केलेले आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 329 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम हटविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.












