जे मला करायला हवे होते; ते योगेश कदमांनी केले

 

शिवसेना नेते रामदास कदम यांचे गौरवोद्गार, खेडमध्ये आदिवासी समाजबांधव मेळावा

खेड(प्रतिनिधी) दुर्लक्षित आदिवासी समाज कागदपत्रांअभावी शासनाच्या विविध योजनांपासून वंचितच राहीला होता. दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी आदिवासी कुटुंबियांना शिधापत्रिकांसह इतर अत्यावश्यक दाखल्यांची तातडीने पूर्तता करत न्याय मिळवून दिला. जे मला जमले नाही, ते आमदार योगेश कदम यांनी करून दाखवले, असे गौरवोद्गार शिवसेना नेते रामदास कदम यांनी काढले.

भरणे येथे आदिवासी समाज बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, तालुक्यात जातीपातीचे राजकारण न करता शिवसेनेच्या माध्यमातून सर्वच समाज घटकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदिवासी समाजाला मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. मात्र अदिवासी बांधवांसाठी शिधापत्रिकांसह अत्यावश्यक दाखल्याची पूर्तता करण्यासाठी आमदार कदम यांनी उचललेले पाऊल वाखाणण्याजोगेच सांगितले. यावेळी आदिवासी
समाजबांधवांना अत्यावश्यक दाखल्यांचे वितरण करण्यात आले. आमदार योगेश कदम यांनीही मनोगतात केवळ दाखल्यांची पूर्तता करून देण्यावरच न थांबता अदिवासी समाजाला यापुढेही कार्यालयात फेऱ्या मारायला न लावता जागेवरच दाखले उपलब्ध करून देण्याचे निर्देशही आधिकाऱ्यांना दिले.

याप्रसंगी तालुकाप्रमुख सचिन धाडवे, माजी जि. जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, प. सदस्य अरूण कदम, तालुका संघटक महेंद्र भोसले, माजी सभापती रामचंद्र आईनकर, महेश जगदाळे यांच्यासह आदिवासी समाजबांधव व पदाधिकारी उपस्थित होते.