रिक्षा चालकाची दुचाकीवरून धडक; दुचाकीस्वार जखमी
रत्नागिरी ः प्रतिनिधी
बेदरकारपणे रिक्षा चालवून अपघात करत दुचाकीस्वाराच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वा. सुमारास मारुती मंदिर परिसरात घडली.
आसिफ रफिक सारंग (41) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल बाजीराव कदम यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी विनय विलास कोरगावकर हे आपल्या ताब्यातील दुचाकीवर मुलाला पाठीमागे बसवून जयस्तंभ ते मारुती मंदिर असे जात होते.
सध्या माळनाका ते मारुती मंदिर रस्त्याचे काम सुरु असल्याने तेथील वाहतुक रस्त्याच्या मधोमध फायबरचे डिव्हायडर ठेवून चालू आहे. दरम्यान, विनय कोरगावकर हे करमरकर हॉस्टिपल समोर आले असता समोरुन आसिफ सारंग आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08-एक्यु-2030) घेउन पुढील एसटीला ओव्हरटेक करुन येत होता. तेव्हा फायबरच्या डिव्हायडरला रिक्षेचा धक्का बसून तो फिर्यादीच्या दुचाकीखाली आल्याने हा अपघात झाला. यात दुचाकीस्वार विनयला किरकोळ दुखापत झाली आहे. रिक्षा चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 281,125(अ) मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












