नारायण सावंत यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी : विजय हरगुडे

भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत यांचा प्रदेशकडून सत्कार

जिल्ह्यातील १३५०९ कामगारांना विविध योजनांचा लाभ दिल्याबद्दल केला विशेष गौरव

सावंतवाडी । प्रतिनिधी :
बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ देण्यासाठी सिंधुदुर्ग भाजपा कामगार मोर्चाने केलेल्या कामाबद्दल भाजपा कामगार मोर्चाच्यावतीने कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत यांचा गौरव करण्यात आला. प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे यांनी त्यांचा सत्कार केला.

भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चाची बैठक नुकतीच मुंबईत झाली. यावेळी मोर्चाच्या कामकाजाचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. मोर्चाच्या वतीने कामगारांच्या संदर्भात असलेल्या विविध योजनांची अंबलबजावणी केली जाते. यावेळी सिंधुदुर्ग, बीड या जिल्ह्यातील कामकाज अव्वल असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील कामगारांची नवीन नोंदणी व योजनाचा लाभ देण्यासाठी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत यांनी दोन महिन्यात विशेष अभियान मोहीम राबविल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार, घरेलू कामगार, वयोश्री योजना आदिचा तब्बल १३५०९ कामगारांना लाभ देण्यात आला.


नारायण सावंत यांच्या या विशेष कामगिरीबद्दल प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे यांनी त्यांचा सत्कार केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम हे उल्लेखनीय असून राज्यातील अन्य जिल्हा समित्यानी त्यांचा आदर्श घ्यावा असे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले. यावेळी नारायण सावंत यांनी म्हटले की, बांधकाम कामगारांना भाजपा कामगार मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. त्याचा मोठा फायदा आगामी निवडणुकात आपल्याला मिळेल. तसेच सावंतवाडी विधानसभा मतदार संघात भाजप मजबूत असून येथील जागा ही भाजपला मिळाल्यास निश्चितपणे येथील उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. त्यामुळे सावंतवाडी विधानसभेची जागा भाजपकडेच देण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.