मुंबई: मराठी मालिकांच्या शीर्षकगीतांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केलं आहे, आणि त्यातून भूतकाळाशी नाळ जोडणारे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचे आज निधन झाले. शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांनी श्रीवर्धन येथे अखेरचा श्वास घेतला. मंगेश कुलकर्णी यांनी ‘आभाळमाया’ आणि ‘वादळवाट’ यांसारख्या मराठी मालिकांच्या शीर्षकगीतांना जादू दिली होती, आणि त्यांची गीतं आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या निधनानंतर मराठी मालिकांच्या शीर्षकगीतांना उंची मिळवून देणारा एक अवलिया हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
मंगेश कुलकर्णी हे फक्त गीतकार नव्हते, तर त्यांनी पटकथाकार म्हणूनही काम केलं. ‘लाईफ लाईन’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती, ज्याचे दिग्दर्शन विजया मेहत यांनी केले होते. त्याचबरोबर, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘येस बॉस’ या गाजलेल्या सिनेमाची पटकथा देखील मंगेश कुलकर्णी यांनी लिहिली होती.
मंगेश कुलकर्णी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी ‘आभाळमाया’ या मालिकेच्या शीर्षक गीताला संगीत दिलं होतं, तर गायिका देवकी पंडित यांनी ते आपल्या सुरेल आवाजात गायलं होतं. या गीतातील शब्द इतके अर्थपूर्ण होते की, ‘जडतो तो जीव, लागते ती आस, बुडतो तो सूर्य, उरे तो आभास’ हे गीत आजही लोकांच्या ओठांवर आहे.












