सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी ही बापूसाहेब महाराजांची कर्मभूमी आहे. ‘राम राज्य ‘ म्हणून ज्याचा उल्लेख झाला त्या सावंतवाडी मतदारसंघाचा उमेदवार म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. या मतदारसंघातील मतदार कधीही पैशाने विकले जाणार नाहीत. मी या सर्वांना प्रेमाने जिंकले आहे. त्यामुळे सावंतवाडी चे सत्व दाखवून द्या व सावंतवाडीचा स्वाभिमान जपण्यासाठी मला तुम्ही निश्चितच साथ द्याल, असा विश्वास महायुतीचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
महायुतीचे जे मोठं धनुष्यबाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात आमच्या हाती दिलं ते पेलण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करीत आहोत. राज्यातील जनतेचा विकास हेच आमचे ध्येय आहे. मागील अडीच वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक लोक कल्याणकारी योजना या सरकारने राबविल्या आहेत. शेतकरी कष्टकरी महिला व युवक यांच्या उत्कर्षासाठी हे सरकार काम करीत आहे. विकासाची ही गंगा अशीच अहोरात्र सुरू ठेवण्यासाठी महायुतीचे सरकार पुन्हा येणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने माझा विजय निश्चित आहे असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सावंतवाडीतील जनतेसाठी आमच्या कुटुंबाने नेहमीच योगदान दिले आहे. विविध उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून माझ्या वडीलांनी अनेकांना रोजगार दिला. वाडवडिलांची हीच पुण्याई घेऊन येथील जनतेच्या सेवेसाठी रेशमी वस्त्रांचा त्याग करून खादी वस्त्रे परिधान करून मी समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झालो. येथील सर्वसामान्य शेतकरी महिला व युवक यांची परिस्थिती मला सुधारायची आहे. मागील काही वर्षात अनेक कामे केली आहेत. आता राहिलेली अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. या जिल्ह्याचा पर्यटनातून विकास करण्यासाठी सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून मी प्रयत्न करीत आहे. आज या व्यासपीठावर महायुतीचे तिन्ही उमेदवार उपस्थित आहेत. विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद आम्हा सर्वांमध्ये आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी करा, असं आवाहन दीपक केसरकर यांनी केले.












