केसरकर यांना निवडून द्या: नारायण राणे यांचे मत

जनतेच्या हिताशी संबंध नसलेल्या विरोधकांना थारा नको

सावंतवाडी । प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांत भारत महासत्तेच्या दिशेने पुढे जात आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या [Grand Alliance] सरकारने अडीच वर्षांत राज्याचा झपाट्याने विकास केला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेत मोठे बदल घडवले आहेत. या विकासाचा प्रवाह अखंड ठेवण्यासाठी महायुती सरकार सत्तेत येणे आवश्यक आहे. लोकसभेत मला जसा आशीर्वाद मिळाला, तसा आशीर्वाद दीपक केसरकर यांनाही मिळावा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असलेले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गांधी चौक येथे आयोजित जाहीर सभेत राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी व्यासपीठावर कणकवलीचे आमदार नितेश राणे, कुडाळ-मालवण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी उपस्थित होते.

मतदारांना सजग राहण्याचे आवाहन
राणे यांनी नमूद केले की, विकास साधायचा असल्यास मतदारांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. ते म्हणाले, “मतदार शांत राहून चालणार नाही. काल नितेश राणे यांनी मतदारांना प्रोत्साहित केले, आज केसरकर तेच करत आहेत. जागृत मतदार योग्य उमेदवार निवडून देऊन आपला विकास साधतो.”

शालेय शिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर हे महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र, त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कार्य पाहता, हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीप्रमाणे आहे, असेही राणे म्हणाले. “नेत्यांची पिशवी धरणारे, कंत्राटातून टक्केवारी घेणारे काही उमेदवार आहेत, ज्यांनी जनसेवेचे काम केलेले नाही. निवडणूक आली की पक्ष बदलतात. अशा उमेदवारांना तुम्ही थारा देऊ नका,” असे आवाहन त्यांनी केले.

महायुतीचे विकासकार्य व जनतेचा विश्वास
राणे यांनी महायुतीच्या विकासकार्यांचा उल्लेख केला आणि कोरोनाकाळात पंतप्रधान मोदी यांनी जनतेचे प्राण वाचवले, असेही नमूद केले. त्यांनी विरोधकांवर टीका केली की, त्यावेळी त्यांनी जनतेचे शोषण केले. “दीपक केसरकर यांच्या कार्याची पोचपावती मागण्यासाठी आम्ही आलो आहोत. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले आहे. लोकसभेत मला निवडून दिलेत त्याचे ऋण विसरणार नाही. तसाच आशीर्वाद केसरकर यांनाही द्यावा,” असे आवाहन राणे यांनी केले.

विरोधकांवर गंभीर आरोप
राणे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर गंभीर आरोप केले. त्यांनी प्रश्न केला की, “समोरच्या उमेदवारांनी काही काम केले आहे का? काही उमेदवार पैसा वाटत आहेत, त्यांची फॅक्टरी कुठे आहे, विचारावे. एका उमेदवाराविरोधात काही लोकांनी दिल्लीत तक्रार दाखल केली आहे. अशा अवैध व्यवसायात गुंतलेल्या लोकांना त्यांची जागा दाखवा,” असे सांगून त्यांनी मतदारांना विचारपूर्वक निर्णय घेण्याचे आवाहन केले.