दापोली | प्रतिनिधी: दापोली तालुक्यामध्ये 65 टक्के कुणबी समाज असून आजपर्यंत कोणत्याही पक्षाने या समाजाला कुठल्याही निवडणुकीची उमेदवारी दिलेली नाही. ती उमेदवारी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष सोनु अबगुल यांच्या रूपाने दिली आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर यांनी व्यक्त केले. परिवर्तनासाठी संतोष अबगुल मनसेच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरले असल्याचे खेडेकर यांनी यावेळी सांगितले.
263 विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आपला उमेदवार उभा केला असून त्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले दापोली विधानसभा मतदारसंघात मनसेचे कार्य खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे हा मतदारसंघात असा सौजन्यशील आहे या मतदारसंघात अनेकांनी प्रतिनिधित्व केले परंतु या मतदारसंघाची प्रगती व्हायला पाहिजे तशी झालेली नाही. गेली वीस वर्ष मी आणि तिन्ही तालुक्याच्या माझ्या सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांनी ही घौडदौड सुरूच ठेवली आहे यापूर्वी दापोली नगरपंचायतीवर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार नगरसेवक निवडून आले होते. खेड नगरपालिका सातत्याने तीन वेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे राहिलेले आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत किंवा सहकारी संस्था असो प्रत्येक ठिकाणी पक्षाचे प्रतिनिधित्व आहे आणि म्हणूनच दापोली मतदारसंघातील एक तरुण उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा मतदार आजही दापोलीमध्ये आहे म्हणूनच संतोष अबगुल यांना या ठिकाणी पक्षाकडून उमेदवारी दिली आहे.
संतोष सोनू अबगुल एका गरीब आणि शेतकरी कुटुंबातील आहेत. एका सामान्य कुटुंबातील ज्याच्या वडिलांनी मुंबई मध अपक्ष हातगाडी ओढुन आपला संसार चालविला व स्वत: संतोष अबगुल हे दिवसा नोकरी व रात्री शाळा शिकुन कुटुंबाला हातभार लावला अशा संतोष अबगुल यांना मनसे पक्षप्रमुख श्री. राज ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. संतोष अबगुल हे कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या कोकणामध्ये 65% समाज हा कुणबी समाज आहे.आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांनी कुणबी समाजाला प्रतिनिधी प्रतिनिधित्व देतो अशा प्रतिज्ञा केल्या होत्या परंतु आजपर्यंत कोणत्याही पक्षाने या समाजाला प्रतिनिधित्व दिलेले नाही, महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव असा पक्ष आहे की ज्यांनी विधानसभा निवडणुकीत कुणबी तसेच बहुजन समाजाला प्रतिनिधित्व देऊन संतोष अबगुल यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातील संपूर्ण कुणबी समाज अबगुल यांच्या पाठीशी उभा आहे. याचाच फायदा आम्हाला या निवडणुकीत होणार आहे याची आम्हाला खात्री आहे.
संतोष अबगुल यांच्या उमेदवाराने या मतदार संघातील चुरस वाढलेले असून येथील गणिते देखील बदलली आहेत. या मतदारसंघांमध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा उमेदवार आम्ही अमुक एवढ्या मताधिक्क्याने निवडून येऊ असे छातीठोक सांगू शकत नाही. परंतु सध्या वातावरण हे सामान्य उमेदवारांच्या बाजूने दिसत असून आमचा उमेदवार या ठिकाणी विधानसभेवर निवडून जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो. आमच्याकडे धनशक्ती जरी नसली तरी आमच्याकडे जनशक्ती आहे. तसेच आम्ही प्रस्थापित नसून आम्ही विस्थापित आहोत जनतेला आता बदल अपेक्षित आहे. सामान्य जनतेला सामान्य माणूसच हवा आहे तशा पद्धतीने आम्ही सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहोत आम्हाला या निवडणुकीत निश्चित यश मिळणार आहे याची तुम्हाला खात्री देतो. यापुढे घराणेशाही असो किंवा कुटुंबशाही असो किंवा ज्यांना फक्त आम्हीच निवडणूक लढवायची असं ज्यांना वाटतं त्यांना आता घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे. मतदार हा शांत आहे ते योग्य उमेदवारच निवडून देणार आहे याची देखील आम्हाला खात्री आहे असा ठणकावून वैभव खेडेकर यांनी सांगितले.











