जुनाट पत्रे बदलणार; रंगरंगोटीचाही समावेश, काँक्रिटिकरणाने खड्डेही बुजवणार, प्रवाशांना मिळाला दिलासा
खेड( प्रतिनिधी) ‘प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद मिरवणाऱ्या येथील एसटी प्रशासनाच्या कारभाराचे पुरते पिंडवडेच निघाले असतानाच बऱ्याच वर्षानंतर बसस्थानकाच्या छत डागडुजीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. रविवारपासून छतावरील जुनाट पत्रे काढून नवीन पत्रे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बसस्थानकाची रंगरंगोटी करून नवा साजही देण्यात येणार आहे. याशिवाय बसस्थानकातील जागोजागी पडलेले खड्डे कॉक्रिटीकरणाने बुजवण्यात येणार असल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
येथील बसस्थानक नानाविध समस्यांच्या गर्तेतच अडकले आहे. आधीच ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या मार्गावर उशिराने सुटणाऱ्या बसफेऱ्यांमुळे प्रवाशी मेटाकुटीस आले आहेत. त्यात बसफेऱ्यांमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडाची भर अद्यापही कायमच असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. भर रस्त्यातच बंद पडणाऱ्या बसफेऱ्यांना प्रवाशांनाच ‘धक्का’ मारावा लागत आहे.
बसस्थानकात स्वच्छतेचेही पुरते तीनतेराच वाजले आहेत. पिण्याच्या पाण्याचाही अभावच आहे. या साऱ्या समस्यांनी प्रवासी त्रस्त असतानाच बसस्थानकात वावरणाऱ्या प्रवाशांचा जीवही टांगणीवरच आहे. बसस्थानकाच्या दुरुस्तीकडे वर्षानुवर्षे दुर्लक्षच करण्यात आले होते. प्रशासनावर डागडुजीबाबत टीकेची झोड उठूनही ‘हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवण्यातच धन्यता मानली होती. डागडुजीअभावी बसस्थानकाची अक्षरशः दयनीय अवस्थाच झाली आहे. छताची बिकट अवस्थाच असून पत्रे कोसळून दुर्घटना घडण्याचा धोकाही कायमच होता.
बसस्थानकातील छताच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असून अंतर्गत डागडुजीही केली जाणार आहे. जुने पत्रे काढून त्या ठिकाणी नवीन पत्रे बसवण्यात येणार आहेत. बसस्थानकातील खड्डेही काँक्रिटीकरणाने बुजवले जाणार आहेत. तसेच बसस्थानकाला रंगरंगोटीही केली जाणार आहे. या साऱ्या कामांसाठी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. येत्या ८-१० दिवसातच ही सर्व कामे पूर्ण होतील.
अखेर दीपावलीच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाला बसस्थानकाच्या दुरूस्तीसाठी सवड मिळाली आहे. बसस्थानकाच्या छताची डागडुजी करण्यासाठी जुनाट पत्रे काढून त्या ठिकाणी नवीन पत्रे बसवण्यात येणार आहेत. अंतर्गत कामे देखील करून प्रवाशांवरील धोक्याची टांगती तलवार दूर केली बसस्थानकाला रंगरंगोटी करून रूपडेही पालटले जाणार आहे. बसस्थानकात जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे चालकांना बस मार्गस्थ कराव्या लागत होत्या मात्र तो ही त्रास आता वाचणार आहे बसस्थानकातील खड्डे काँक्रिटीकरणाने बुजवून मार्ग सुस्थितीत आणला जाणार आहे.
बऱ्याच वर्षानंतर एसटी प्रशासनाला छताच्या डागडुजीसाठी मुहूर्त मिळाल्याने प्रवाशांची चिंता काही अंशी दूर झाली आहे. एसटी प्रशासनाने बसस्थानकातील छताच्या दुरूस्तीचे काम हाती घेवून प्रवाशांना दिलासा दिला असला तरी धोकादायक स्थितीतील भिंतींचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही वर्षापूर्वी बसस्थानकातील भिंतीचा भाग कोसळून विद्यार्थी जखमी झाला होता. बसस्थानकातील भिंतीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. धोकादायक भिंतीमुळे दुर्घटना घडल्यास त्यास. जबाबदार कोण, असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे











