
संतोष वायंगणकर :महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणुक प्रचाराचे मुद्दे वेगळेच आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातला सत्तासंघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर आला आहे. पूर्वी निवडणुकांमध्ये विकासावर चर्चा व्हायची आम्ही काय केलय, काय करणार आहोत. हे सांगितले जायचे आता वैयक्तिक टिका हाच निवडणुक प्रचाराचा मुद्दा मानला जातो. कोकणात निवडणुक कोणतीही असो परंतु त्या प्रत्येक निवडणुकीत गेली ३४ वर्षे राणेंचा दहशतवाद या शब्दाभोवती राणेंचे विरोधक निवडणुक प्रचाराची गुंफण करतात. राणेंचे विरोधक कोकणातील जनतेला राणेंची दडपशाही कशी आहे. राणेंचा दहशतवाद कसा आहे हे सांगत आहेत. परंतु गेली ३४ वर्षे कोकणातील जनता मात्र राणेंपासून दुरावलेली नाही. हे आजवरच्या सर्व निवडणुक निकालातून स्पष्ट झाले आहे. निवडणुका जाहीर झाल्या की दहशतवाद हा कोकणात तरी हजारोवेळा भाषणातून वापरून गुळगुळीत झालेला शब्द आहे. राणेंची दडपशाही आणि दहशतवाद या लोकशाहीत इतका भारी असता तर जे कोणी राणे विरोधक वाट्टेल त्या पद्धतीने टिका-टिप्पणी करतात ते करू शकले असते का ? राणे दहशतवादी असते तर तीन-तीन चार-पाचवेळा कोकणातील जनतेने त्यांना निवडून दिले असते का ? कोकणातील जनता सूज्ञ आहेच. कोकणातील जनतेला समजत विकास कोण करू शकत. सत्ता असली किंवा नसली तरीही विकासाच्या दिशेने कोण वाटचाल करू शकतो हे पक्क ठाऊक असल्यानेच कोकणातील जनतेने राणेंची पाठराखण केलेली दिसेल. विकासाची दृष्टी कोणाकडे आहे आणि विकास प्रकल्पांना विकास प्रक्रियेला विरोध कोण करतो हे जनतेला माहित असल्यानेच जनता विकासाच्या बाजूने उभी रहाते. राणेंना जे विरोध करतात त्या विरोध करणाऱ्यांनाही अनेकवेळा आपण विरोध कशासाठी करतोय हेच माहिती नसत. सहा महिन्यापूर्वीच लोकसभेची निवडणुक पार पडली या निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत खा. नारायण राणे निवडून आजे. लोकसभा निवडणुकीतही राणे विरोधी जेवढा प्रचार करता येईल तो करण्यात आला. परंतु जनतेने मतदान हे विकासाच्या बाजूने केले. जे राणे विरोधक विरोधीपक्षीय यांना खरंतर लोकसभा निवडणुक निकालाने विधानसभेचेही चित्र स्पष्ट केले आहे. राणेंची दडपशाही आणि दहशतवाद असता तर ३०-३५ वर्षे जनता सहन करत बसणार नाही. राणे विरोधक दहशतवादाने लोकांच्या मनात दिर्घकाळ स्थान निर्माण करता येत नाही. तर त्यासाठी जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा लागतो. जनतेशी अतुट नातं जोडवं लागत. सर्वसामान्य जनतेच्या कोणत्याही प्रसंगात कौटुंबिक नात्याने उभं रहावं लागत. त्याशिवाय इतकी वर्षे राणे या नावाशी कोकण बांधल गेलं नसत. याचा विचार राणे विरोधकांनी कधीच केला नाही. मिडियामध्ये राणे नावाचा टिआरपी फार वरचा आहे. यामुळेच राणेंचे अनेक विरोधक फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी राणेंवर टिका-टिप्पणी करतात. कोकणात निवडणुकीत राणेंच नाव न घेता विकासावर बोला, विकासावर चर्चा करा असे विरोधी पक्षाच्या उमेदवारांना सांगितले गेले तर आपण काय केल किंवा विकासाची आपली ही संकल्पना आहे हे सांगण्याची मानसिकता नाही. एक गंमतीची गोष्ट अशी आहे. राणेंवर तोंडभरून विरोध करणाऱ्यांनीच सहा महिन्यापूर्वी राणेंचा दहशतवाद आम्ही संपवला अशा राजकिय स्टेटमेंट करायची आणि त्यानंतर महिन्या-दोन महिन्यात पुन्हा दहशतवादावर बोलायचे याला काय म्हणायचे ? एकिकडे कोकणात राणेंनी काय केलं ? म्हणून विचारायचे आणि राणेंनी कोकणात कोणताही प्रकल्प आणण्याची घोषणा केली किंवा एखाद्या प्रकल्पाचे नाव घेतले की त्याला विरोध करायचा. जनतेचा बुद्धीभेद करायचा आणि राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करायचा गेल्या काही वर्षात राणे विरोधकांचा हा एककलमी कार्यक्रम आहे. येणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाने कोकणात कोणते बदल होणार आहेत हे कधीतरी जाणून घेण्याची मानसिकता विरोधक म्हणवून घेणाऱ्यांनी ठेवली पाहिजे. सांगण्यासारख काही नसल तरीही मग राणेंच नाव घेऊन फक्त अपप्रचार करायचा हे धोरण रहात. दहशतवादाच्या नावाने सातत्याने अपप्रचार करून कोकणालाच बदनाम करण्यात आलय. पर्यटन विकासात कोकण प्रगती करत असताना दहशतवादावर चर्चा करीत राहून कोकणालाच बदनाम करीत कोकणातील पर्यटन व्यवसायाला खीळ घालण्याच काम केलं जातय याचा विचारही सातत्याने विरोधाची भुमिका बजावणाऱ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. बर विकासकामांना प्रकल्पांना विरोध करताना त्यामागचा हेतू शुद्ध नसतो हे जनतेलाही कळून चुकलय. सर्व प्रकल्पांना होणारा विरोध हा राजकीय स्वार्थासाठी होणारा विरोध आहे. त्यात कोणताही नि:स्वार्थभाव दडलेला नाही. यामुळे कोकणातील राणेंची दडपशाही, दहशतवाद हे वापरून-वापरून गुळगुळीत झालेले शब्द आता प्रचाराचे मुद्दे होऊ शकत नाही. त्यासाठी राणे विरोधकांना विकासाचा विचार आणि अभ्यास करावा लागेल. विकासावर बोलावं लागेल.












