दोडामार्ग सर्वाधिक वेगाने विकसित होणार
रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार
दोडामार्गमध्ये उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्याचा मी जन्मदाता आहे. तालुक्याच्या कामांना मी कायम प्राधान्य दिलंय. येत्या काळात जिल्ह्यात सर्वात वेगाने विकसित होणारा दोडामार्ग तालुका असेल. तिलारी परिसरात १४०० एकर जागेत हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या मशिनरी व अन्य पूरक साधनांचे कारखाने उभे राहतील. यातून हजारो रोजगार उपलब्ध होतील. यासाठी असोसिएशनच्या संचालकांशी चर्चाही झाली आहे. आडाळी एमआयडीसीसाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना मी सर्वाधिक दर मिळवून दिला. वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदार संघ विकसित होण्यासाठी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे रहा. विकासाची जबाबदारी माझी आहे, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी दोडामार्गवासियांना प्रचार सभेतून दिला.

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ पिंपळेश्वर हॉल येथे प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खा. नारायण राणे बोलत होते. व्यासपीठावर उमेदवार दीपक केसरकर, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, महिला जिल्हाप्रमुख नीता सावंत कविटकर, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक संतोष नानचे, नगरसेविका संध्या प्रसादी, सोनाली केसरकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सत्यवान गवस, भाजपा पक्ष निरीक्षक दत्ता नाईक रेडकर, संदीप कुडतरकर, दीक्षा महालकर, नितीन मणेरीकर, राजेश प्रसादी, विश्वासराव देसाई उपस्थित होते.
खा. नारायण राणे म्हणाले, उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात आले नि केवळ टीका करून गेले. विकासावर एक शब्दही बोलले नाहीत. मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षात एक तरी प्रकल्प आणला का ? राज्याच्या, सिंधुदुर्गाच्या विकासात तुझे योगदान काय ? मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत काय केले ते सांग. मुळात त्याची मुख्यमंत्री पदाची पात्रताच नाही. मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. त्यामुळे त्याला चांगलाच ओळखतो. कणकवलीच्या सभेत दीपक केसरकर, नारायण राणे यांच्यावर टीका कशासाठी. नितेश राणेवर टीका करण्याची हिम्मत का झाली नाही ? असा सवाल उपस्थित केला.
दोडामार्ग तालुक्याला उज्वल भवितव्य आहे. आडाळीत उद्योग सुरू होण्यासाठी स्थानिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. मी जिल्ह्यात येण्यापूर्वी दरडोई उत्पन्न ३५ हजार होते. आज अडिज लाख रुपये झालंय. भविष्यात पाच लाख रुपये करण्याचा मानस आहे. देशात मोदींचे कणखर नेतृत्व आहे. राज्याचा विकास होण्यासाठी महायुती शासन येणे गरजेचे आहे. यासाठी मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी राजन तेली, विशाल परब यांच्यावर सडकून टीका केली. राजन तेली कणकवलीत दुकानात पुड्या बांधायचा. शाखेत आल्यावर ओळख झाली. नंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बँक चेअरमन केलं. विधान परिषदेत मतांची जुळवणी करून सर्वाधिक २९ मते मिळवून आमदार केला. तरीही बेइमानी केली. तिकिटासाठी दुसऱ्या पक्षात गेला. मी कधी टक्केवारी घेतली नाही. तेली, उपरकर माझ्या कार्यालया बाहेर असायचे. ठेकेदारांकडून टक्केवारी घेण्याचे काम करायचे. आमदारकीच्या काळात साधे एक भाषण करू शकला नाही.
अपक्ष उमेदवार विशाल परब याला मतदारांनी विचारले पाहिजे तुझा उद्योग काय ? तो सांगू शकणार नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशी कोणतीही निवडणूक न लढविता डायरेक्ट आमदारकीची स्वप्ने पाहतोय. प्रशासकीय कामाचा काहीही अनुभव नाही. चेन्नई, दिल्लीत जाऊन पैसे आणायचे, लोकांच्या जमिनी विकायच्या एवढेच काम. आमदारकी जनतेच्या सेवेसाठी असते असा टोला लगावला.
दीपक केसरकर म्हणाले, दोडामार्गमध्ये नवीन आयटीआय, हॉस्पिटल इमारत, नगरपंचायत इमारत, फिश मार्केट, पंचायत समिती इमारतीसाठी करोडो रुपयांचा निधी दिला. तळकट कुंभवडे रस्ता, मांगेली रस्ता, फुकेरी हनुमंतगड रस्ता यासाठी निधी दिला. युवक, शेतकरी, महिला, बचतगट यासाठी अनेक योजना सुरू केल्या. काजू उत्पादकांना २८० कोटी रुपये अनुदान मंजूर केले. आडाळीत रस्ते, पाणी, विजेसाठी निधी दिला. बांद्यात कारखाना सुरू करून ६५० जणांना रोजगार मिळवून दिला. असे असतानाही विरोधक खोटा प्रचार करीत आहेत. आपला व परका कोण याचा निर्णय तुम्ही घ्या. मुंबईचे नेते येऊन काहीही बोलणार हे सहन करणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी उबाठा उप तालुका प्रमुख बबलू पांगम, माटणे शाखा प्रमुख सागर गवस, प्रदीप शिरोडकर, वैभव शिरोडकर, दिनेश हरमलकर, जयवंत कासार, साहिल नाईक, उमेश गवस, विनोद गेळेकर, पंकज, प्रथमेश, कृष्णा पर्रीकर यांच्यासह उबाठा कार्यकर्त्यांनी खा. नारायण राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रचारसभेला महिलांची संख्या लक्षणीय होती.












