सिंधुदुर्गात महायुतीचाच वरचष्मा…!

 

सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या लोकसभा निवडणुकीत अवघ कोकणच महायुतीच्या बाजूने राहिले. कोकणातील मतदारांनी भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदेगट, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीला चांगल यश दिलं होतं. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघात ४२००० मताधिक्य मिळाले. तर कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात २७००० च मताधिक्य मिळालं होत. तर सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ले विधानसभा मतदारसंघात २७००० चं मताधिक्य मिळाले. लोकसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार खा.नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास एक लाखाच मताधिक्य मिळाले. याच ९५,२७ मतांच्या मताधिक्याने खा.नारायण राणे यांचा लोकसभागृहात प्रवेश करण्याचा मार्ग सुखकर केला आणि त्याच लोकसभा निवडणुक निकालाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत हे तिन्ही मतदारसंघ महायुतीकडे की महाविकास आघाडीकडे हे चित्र स्पष्ट झालेच त्याचवेळी कुडाळ-मालवण विधानसभा निवडणुकीत काय होणार त्याचा ट्रेलरच समोर आला होता. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील २७००० च खा. नारायण राणे यांना मिळालेल मताधिक्य या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आ.वैभव नाईक यांच्यासाठीही ही धोक्याचीच घंटा होती. मालवण- कुडाळ विधानसभा मतदारसंघात मालवणच्या किनारपट्टीने वाहणारे वारेही महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्यासाठी अधिक उर्जा निर्माण करणारे आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघात मागील दहावर्षात आ.वैभव नाईक यांच्याकडून सांगण्यासारखे कोणतेही विकासकाम झालेली नाहीत. यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, सुषमा अंधारे, शरद कोळी यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात येऊन नेहमीप्रमाणे राणेंविरोधात करता येईल तितकी टिका केली. आ.वैभव नाईक कुडाळ-मालवण मतदारसंघातील विकासकामांवर बोलू शकत नाहीत. यामुळेच बेताल वक्तव्य करणारी, भडकावू भाषण ठोकणाऱ्यांचा आधार घेण्याची वेळ आ.वैभव नाईक यांच्यावर आली आहे. माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी आपणाला जनतेने निवडून द्यावे आपण आमदार म्हणून कुडाळ-मालवण मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय राहणारे नसल्याचे सांगतानाच मतदारसंघाच्या विकासाचा मास्टर प्लॅनच तयार आहे. यामुळे कुडाळ-मालवण मतदारसंघात विकास विरूद्ध फक्त टिका टिप्पणी अशी ही लढत असली तरीही या मतदारसंघात निलेश राणे चांगल मताधिक्य घेऊन निवडून येतील असं कार्यकर्तेच नव्हेत तर मतदार स्पष्टपणे बोलत आहेत.

देवगड-कणकवली-वैभववाडी विधानसभा मतदारसंघात या मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितेश राणे यांची हॅटट्रीक निश्चित आहे. फक्त आ.नितेश राणे कितीच मताधिक्य घेणारे याचीच उत्सुकता आहे. गेल्या दहावर्षात कणकवली-वैभववाडी-देवगड विधानसभा मतदारसंघात जी विकासकामे झालेली आहेत ती विकासकामे जनतेसमोर असल्याने आ.नितेश राणे यांनी गेल्या दहावर्षात काय केलं हा प्रश्न विरोधक विचारू शकत नाहीत. देवगड, वैभववाडी, कणकवली या तिन्ही तालुक्यात तिथल्या भौगोलिक स्थिती प्रमाणे विकास एका वेगळया दृष्टीकोनातून करण्यात आला आहे. यामुळे या विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर निवडणुक लढवत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंतर्गत असलेली सुप्त गटबाजी आणि नाराजीमुळे आ.नितेश राणे यांच मताधिक्य वाढवणारी आहे. या मतदारसंघात आ.नितेश राणे यांच्या विरोधात निवडणुक लढवण्यास कोणीच तयार होत नव्हत. शेवटी संदेश पारकर यांना उमेदवारी देऊन या मतदार निवडणुकीत उतरविण्यात आले. अपक्ष म्हणून खाणी निवडणुक लढवत आहेत. अपक्ष उमेदवार खाणी यांनीही विशेषकरून मुस्लीम मतदारांना साद घातली आहे. आ.नितेश राणे कणकवली-वैभववाडी-देवगड मतदारसंघातून मोठ मताधिक्य घेऊन विजयी होतील असं राजकीय जाणकारांना वाटत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिसरा मतदारसंघ म्हणजे सावंतवाडी-वेंगुर्ले-दोडामार्ग विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे राज्याचे शिक्षणमंत्री असलेले दिपक केसरकर गेली पंधरावर्षे या भागाचे नेतृत्व करीत आहेत. सावंतवाडी-वेंगुर्ले-दोडामार्ग या तिन्ही तालुक्यांमध्ये विकासकामांना चालना कशी देता येईल, विकास निधी कसा आणता येईल यासाठी आ.दिपक केसरकर यांनी नेहमीच प्रयत्न चालविले आहेत. मतदारसंघातील जनतेशी संपर्क आणि स्नेह जपणारा आमदार म्हणून दिपक केसरकर यांची ओळख आहे. या सावंतवाडी-वेंगुर्ले-दोडामार्ग विधानसभा मतदारसंघात उबाठाकडून माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार सौ.अर्चना घारे आणि अपक्ष उमेदवार विशाल परब निवडणुक रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार सौ.अर्चना घारे यांनी ग्रामीण आणि शहरी भागात प्रचारात आघाडी घेतली आहे. महिलांचाही त्यांना वाढता पाठींबा आहे. उबाठाचे राजन तेली यांचा पंधरा दिवसापूर्वी झालेला शिवसेना प्रवेश शिवसैनिकांनाच रूचला नाही. यामुळे शिवसैनिकही उत्साहाने प्रचारात दिसत नाहीत. या विधानसभा मतदारसंघात उलट-सुलट चर्चा कोणतीही असली तरीही आ.दिपक केसरकर चौथ्यांदा निवडून येतील अशी स्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार विजयी होतील हे आजच स्पष्ट चित्र आहे.