महाराष्ट्रात महायुतीच्या १६० जागा येतील : माधव भांडारी
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वाधिक १६० पेक्षा अधिक जागा निवडून येऊन राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त करतानाच आ.नितेश राणे यांची हिंदुत्ववादी भुमिका येत्या काळाजी गरज आहे असे स्पष्ट मत भाजपाचे ज्येष्ठे नेते, उपाध्यक्ष माधवराव भांडारी यांनी दै.प्रहार आणि प्रहार डिजिटलशी बोलताना व्यक्त केले. माधवराव भांडारी म्हणाले, भाजपाच हिंदुत्व हे काही मत मिळवण्यासाठीचं बेगडी हिंदुत्व नाही. तो हिंदुत्वाचा विचार आहे. हा विचारच देशाच्या विकासाचा आणि देश मजबुतीने उभा रहाणारा विचार आहे.
आ.नितेश राणे भाजपाचा हाच हिंदुत्ववादी विचार समाजमनात अधिक घट्टपणे रूजवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळेच आ.नितेश राणे कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघात मोठं मताधिक्य घेऊन विजयी होतील. यात तीळमात्र शंका नाही. आ.नितेश राणे यांनी मतदारसंघात जो विकास कामांचा धडाका लावलेला त्यामुळे मतदारसंघातील जनता त्यांच्या पाठीशी असल्याचे भांडारी यांनी सांगितले. २० नोव्हेंबरच्या मतदानासाठी माधव भांडारी सिंधुदुर्गात आले आहेत. देवगड येथे त्यांची भेट झाली असता ते बोलत होते.
महाराष्ट्रात कोणत्याही स्थितीत पुन्हा एकदा भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच सत्तेवर येईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजही मी त्यांच्यावर केलेली टिका, त्यांना निरूत्तर केलेले ते विसरलेले नाहीत. असेही माधव भांडारी यांनी सांगितले.












