मंडणगड | प्रतिनिधी – विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करिता 20 नोव्हेंबर 2024 रोजी तालुक्यात राबवण्यात आलेली मतदान प्रक्रीया शांततेत संपन्न झाली. मतदानाकरिता निवडणूक आयोगाने मंडणगड तालुक्यात 74 मतदान केंद्रे सज्ज केली होती. तालुक्यात 57 हजार 477 मतदार मतदानास पात्र होते. यात 29 हजार 912 महिला मतदार व 27 हजार 566 पुरुष मतदारांचा समावेश आहे. तालुक्यात सकाळच्या दोन तसांचे सत्रात मतदात्यांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. दुपारी उन्हे वाढल्यावर मतदानाचा उत्साह ओसरताना दिसून आला. सायंकाळी 5.00 वाजेपर्यत तालुक्यातील 59 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदान प्रक्रीया शांततेत संपन्न व्हावी या करिता निवडणुक आयोगाचेवतीने 74 मतदान केंद्रांवर 74 क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 74, आशा सेविका 70, अंगणवाडी सेविका 70, कार्यालयीन सेवक 70, स्वयंसेवक 74, पोलीस अधिकारी 3, पोलीस कर्मचारी 91, गृहरक्षक दलाचे जवान 70 , सशस्त्र सिमा दलाचे 12 जवान असे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांच्या प्रवासाकरिता 11 एस.टी. बसेस सोडण्यात आल्या आहेत. तालुक्यातील 17 मतदान केंद्रांवर नेटवर्क नसल्याकारणाने या ठिकाणी 17 श्याडो मँसेजर (संदेश वाहकांची) नियुक्ती करण्यात आलेले होते. मंडणगड तालुक्यात 14 दिव्यांग व 85 वर्षांचेवरील 226 जेष्ठ नागरिक असे एकूण 240 होम व्होटर आहेत. यात 210 जेष्ठ नागरीक मतदार व 14 दिव्यांग असे 224 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजवित होम व्होटींग केले आहे. बहुरंगी लढतीमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुंबई व पुणे स्थित मतदार येण्याची शक्यता होती, अपेक्षनुसार चाकरमनी मतदार मोठ्या संख्येने दाखल झाले. तरी त्यामुळे मतदानाचे सरासरी टक्केवारीवर विशेष परिणाम झालेला दिसून आला नाही. प्रशासनाने जेष्ठ नागरीक व दिव्यांगानी मतदान करावे या करिता प्राधान्याने सुविधा देत मतदान करण्यासाठी सहकार्य केल्याने या वर्गातील मतदात्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. तालुक्यात नव्वदी पार केलेल्या अनेकांनी मतदानाचा अधिकार बजाविला. सुशिक्षित मतदारांनी मतदानानंतर समाज माध्यमांमध्ये आपले फोटो शेयर करीत इतर नागरीकांना मतदानाची कर्तव्यपुर्ती कऱण्याचा संदेश दिला आहे.












