राजापूर विधानसभा मतदार संघातील जनतेचा कौल विकासाला..

 

आता सर्वांगिक विकासाच्या पुर्ततेची अपेक्षा 

नरेंद्र मोहिते l राजापूर :राजापूर्- लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील जनतेने पंधरा वर्षांनी परिवर्तन घडवित विकासाचा अजेंटा घेऊन निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या महायुतीच्या किरण सामंत यांना भरभरून मतांचे दान देत त्यांच्या बाजुने कौल दिला आहे. जिल्हयात विकासाच्या बाबतीत मागास असा शिक्का बसलेल्या व रस्ते, पाखाडया आणि भावनिक राजकारणात अडकून पडलेल्या या मतदार संघाला गेली कित्येक वर्षे सर्वांगिण विकासाची आस लागून राहिली आहे. रोजगार, आरोग्य, शिक्षण, शेती, पर्यटन या दृष्टीने या तालुक्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्यातून मोठया प्रमाणावर होत असलेले स्थलांतर ही मोठी समस्या या मतदार संघाची असून स्थानिक पातळीवर छोटे मोठे उद्योग या ठिकाणी येऊन येथील बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी निश्चीत धोरण आखण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने भविष्यात उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता आहे. विकासाच्या मुद्दयावर झालेल्या या निवडणूकीत मतदारांनी विकासाच्या बाजुने कौल देत तब्बल १५ वर्षांनी या मतदार संघात परिवर्तन घडवत महायुतीचे उमेदवार किरण उर्फ भैया सामंत यांना संधी दिली आहे. राज्यातही महायुतीचेच सरकार विराजमान होत असल्याने नक्कीच आमदार म्हणून विधानसभेत जाणारे किरण सामंत हे राजापूर विधानसभा मतदार संघाच्या रखडलेल्या विकासाला न्याय देतील आणि मागासलेला मतदार संघ ही या मतदार संघाची ओळख पुसतील असा मतदारांना विश्वास आहे. त्यामुळे आता राजापूरकरांना मतदार संघाच्या सर्वांगिण अशा विकासाची आस लागून राहिली आहे.

राजापूर लांजा साखरपा हा दुर्गम मतदार संघ आहे. कै. भाईसाहेब हातणकर यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत या तालुक्याला दळणवणाच्या साधनसुविधा निर्माण केल्या. गाव तीथे एसटी पोहचू शकली. त्यामुळे विखुरलेला मतदार संघ तालुक्याच्या ठिकाणाला जोडला गेला. मात्र मुलभूत सोयी सुविधांनी हा मतदार संघ मागास राहिला. त्यानंतरच्या काळात शिवसेनेची सत्ता आली. सुरूवातीच्या काळात कै. विजयराव उर्फ आप्पा साळवी यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. मात्र रत्नागिरी वासिय असलेल्या आप्पा साळवी यांनी म्हणावे तेवढे लक्ष दिले नाही. त्यानंतर गणपत कदम यांनी या मतदार संघाचे आमदार म्हणून निवडून आल्यावर कै. भाई साहेब हातणकर यांनी सुरूवात केलेल्या विकासाच्या रथाला गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कच्या रस्त्यांचे पक्या डांबरी रस्त्यांमध्ये रूपांतर करताना गावागावात विज आणि पाण्याचे प्रश्न मार्गी लागले. धरण प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा निर्माण केली. गावो गावी रस्ते, पाखाडया यातून गावांगावांत मुलभूत सोयी सुविधांची जोडणी करण्याची कामे हाती घेतली. राजापुरातील विज समस्याही सोडविण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. दहा वर्षे त्यांनी प्रतिनिधीत्व करत या मतदार संघाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र त्यानंतर शिवसेनेचे राजन साळवी यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. सन २००९ ते २०२४ अशी गेली पंधरा वर्षे आमदार राजन साळवी यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. परंतु त्यांनी आपल्या या पंधरा वर्षांच्या कालखंडात रस्ते, पाखाडया, नळयोजना या पलिकडे जावून रोजगार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन या दृष्टीने भरीव काम करणे अपेक्षीत असताना केवळ भावनिक राजकारण करत या मतदार संघात आपले हातपाय रोवले. परंतु या तालुक्याला अन्य तालुक्याच्या बरोबरीने नेण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते न होता केवळ येणाऱ्या प्रकल्यांना विरोध आणि त्या जोरावर व्होट बँक सांभाळण्याचे धोरण अवलंबिले. मात्र या साऱ्या गोष्टींचा हिशोब राजापूरच्या जनतेने चुकता करत किरण सामंत यांना निवडुन दिले आहे. भावनिक राजकारणापेक्षा विकासही महत्वाचा आहे हे जनतेने जाणले आणि अखेर परिवर्तन घडविले.

राजापूर मतदार संघात रोजगारीचा प्रश्न गंभीर आहेच पण चांगली आरोग्य सुविधा नाही, चांगल्या शैक्षणिक सेवा सुविधा नाहीत, रोजगारीसाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरांत होणारे स्थलांतर असो असे अनेक मुद्दे आहेत. ग्रामीण भागात आजही रस्ते, पाणी या सुविधांची वाणवा आहे. या मतदार संघात विकासाच्या मुद्दयावरच ही निवडणूक लढविली गेली आहे. महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी आपण बोलण्यापेक्षा कामाला महत्व देणारा माणूस असून आपण कामातुन ते सिध्द करून दाखवू अशी ग्वाही दिलेली आहे.

किरण सामंत हे रत्नागिरी जिल्हयातील एक प्रसिध्द उद्योजक आहेत. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातुन त्यांचा रत्नागिरीच नाही तर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात दांडगा संपर्क आहे. त्यांचे बंधू राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे गेली ३० वर्षे राजकारणात आहेत. यावेळी ते पाचव्यांदा रत्नागिरी विधानसभा मतदार संघातुन निवडून आले आहेत. त्यांनी रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून काम करताना प्रत्येक तालुक्याला व मतदार संघाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. किरण सामंत यांना आपल्या व्यवसायातुन समाजकारण करताना त्याला आता राजकिय जोड मिळाली असून जनतेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्यांना या निवडणूकीतील विजयाच्या माध्यमातुन मिळाली आहे. उदय सामंत यांचे राजकारणातील असलेले वजन व महायुती सरकार मधील त्यांचे भक्कम स्थान निश्चितच किरण सामंत यांच्या माध्यमातुन राजापूर विधानसभा मतदार संघातील विकासाला गती देण्यासाठी महत्वाचे असे ठरणार आहे.

लोकसभा निवडणूकीपासून मतदार संघात वाडीवस्तीवर पोहचलेल्या किरण सामंत यांना या मतदार संघातील जनतेचे प्रश्न आणि समस्यांची चांगलीच जाण आता आलेली आहे. इथली बंद घरे, बेरोजगार युवक आणि गावातील परिस्थिती याबाबतही त्यांना चांगली माहिती आहे. त्यामुळे भविष्यात ते नक्कीच या मतदार संघातील विकासाचा एक आराखडा तयार करून विकास करण्याचा प्रयत्न् करतील अशी खात्री मतदारांना आहे.

बेरोजगारीचा गंभीर प्रश्न ही या मतदार संघाची मोठी समस्या आहे. आजपर्यत अनेक मोठया प्रकल्पांची घोषणा या मतदार संघात झाली, मग जैतापूर अणुऊर्जा असो, नाणार व बारसू रिफायनरी असो, आयलॉग पोर्ट असो की मायनिंगचा प्रकल्प असो, हे सर्व प्रकल्प राजकिय विरोधाचे बळी ठरले आणि राजापुरच्या विकासाला ब्रेक लागलेला आहे. यासाठी नव्याने विचार होण्याची आवश्यकता आहे, किरण सामंत यांनी पर्यावरण पुरक दोन नवीन मोठे उद्योग राजापुरात आणण्याची घोषणा केलेली आहे. ते प्रकल्प मार्गी लागले तरी राजापूरच्या विकासाला गती मिळेल व बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल.

प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेची कामे वेळीच मार्गी लागावीत अशी जनतेची अपेक्षा असते, त्यासाठीही ते काम करतील आणि जनतेचे प्रश्न सोडवतील अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यासाठी जनतेने त्यांना सधी दिली आहे.

राजापूर मतदार संघात परिवर्तन झाले आणि आता लगेचच विकास होईल असे होणार नाही, सगळयात मागास मतदार संघ अशी राजापूरची ओळख आहे ती पुसण्यासाठी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी किरण सामंत हे नक्कीच प्रयत्न् करतील मात्र त्यासाठी त्यांना काही वेळ देणंही अपेक्षित आहे. उदय सामंत यांच्या निवडणूकांची सलग चार वर्षें किरण सामंत यांनी रणनिती सांभाळली आहे. तर विकासात्मक काम आणि योजनांची त्यांना माहिती असून कोणत्या कामासाठी कसा व कुठून निधी आणावयाचा याची त्यांना चांगली माहिती आहे. त्याचा फायदा त्यांना निश्चित होणार आहे. त्यामुळे टप्प्या टप्प्याने व प्रश्न आणि समस्यांच्या प्राधान्य क्रमाने ते विकासाला नक्कीच न्याय देतील अशी जनतेची अपेक्षा आहे.

विकासाच्या मुद्दयावर जनतेने पंधरा वर्षांनी का होईना या मतदार संघात परिवर्तन केले आहे. त्यामुळे नव्याने आमदार झालेल्या किरण सामंत यांची आता जबाबदारीही वाढली आहे.याची त्यांनाही जाणीव आहे. त्यामुळे आपल्या कमी बोलणे आणि काम करणे या स्वभावाप्रमाणे ते नक्कीच भविष्यात राजापूर मतदार संघाला विकासाचा नवा आयाम देतील अशी जनतेला खात्री आहे. त्यामुळे आता राजापूर विधानसभा मतदार संघाची वाटचाल ही विकासाच्या दिशेने सुरू झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

 

————————————————–