राजापुरच्या विकासाचा रथ आता वेगाने धावेल
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर, लांजा साखरपा विधानसभा मतदार संघातील जनतेने विकासाच्या बाजुने कौल दिलेला आहे. नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांच्या रूपाने झपाटून काम करणारे नेतृत्व या मतदार संघाला आता मिळाले आहे. त्यामुळे या मतदार संघाचा गेले काही वर्षे काहीसा ठप्प झालेला विकास भविष्यात नक्कीच वेगाने होताना दिसेल अशी प्रतिक्रिया शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू यांनी दिली आहे.
या मतदार संघातील निवडणूक ही मतदारांनी भविष्यातील विकासासाठी आपल्या हातात घेतली होती. त्यामुळे किरण सामंत यांचा विजय निश्चित होता. मात्र निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पराभव दिसू लागताच विरोधकांकडून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सोशल मिडियावर आमच्या विरोधात अपप्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण राजापूरची जनता आणि मतदार सुज्ञ आहेत हे त्यांनी त्यांच्या कृतीतुन विकासाचा अजेंटा घेऊन निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या किरण सामंत यांना भरघोस मतांनी विजयी करून दाखवून दिले असेही हाजू यांनी नमुद केले.
शिवसेनेचे एक निष्ठावान आणि जुने जाणते कार्यकर्ते असलेले व सामंत कुटुंबीयांशी कौटुंबीक स्नेह असलेल्या अशफाक हाजू यांनी या निवडणूकीत प्रारंभीपासूनच झोकून देत काम केले. त्यांचा पुर्वी पासून तालुक्यातच नाही तर संपुर्ण मतदार संघात वाडी वस्तीवर व घराघरात संपर्क राहिलेला आहे. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातुन त्यांचे सर्व स्तरावर अत्यंत चांगले ऋणानुबंध आहेत. त्याचा फायदा त्यांनी या निवडणूकीत आपल्या पक्षाचे उमेदवार किरण सामंत यांना करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महायुतीबाबत मुस्लीम विरोधी असा होणारा प्रचार आणि प्रसारही त्यांनी प्रत्यक्ष भेटून मतदारांशी संपर्क साधून खोडून काढला .
या निवडणूकीतील किरण सामंत यांच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना तुमचा आमचा सगळयांचा लाडका भैय्या आमदार झाला आहे. यासारखा दुसरा आनंद नाही असे नमुद करत आता खऱ्या अर्थाने राजापूर मतदार संघाच्या विकासाला गती मिळणार असल्याचे हाजू यांनी सांगितले. किरण सामंत हे विकासाचे व्हीजन असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या सोबत काम करताना त्याची वारंवार प्रचिती आली आहे. कोणाचेही काम असो भैय्याने कधीही जात, पात, धर्म आणि पक्ष पाहिला नाही, आलेल्या व्यक्तीचे काम करणे हेच त्यांचे ध्येय असते व तेच ते करत असतात. त्यामुळे आता राजापूर मतदार संघातील जनतेला आपला हक्काचा आणि हक्काने काम करणारा आमदार लाभला आहे.
राजापूर मतदार संघाच्या भविष्यातील विकासाच्या अनेक संकल्पना भैय्यांकडे आहेत, भविष्यात ते नक्कीच त्या पुर्ण करतील यात शंका नाही. रस्ते, विज, पाणी या प्राथमिक सुविधा आहेत. पण आरोग्य आणि शैक्षणिक सेवांचा दर्जा सुधारताना इथल्या बेरोजगारांना रोजगार देण्याचे महत्वाचे काम ते मार्गी लावतील असा विश्वासही हाजू यांनी व्यक्त केला.
विरोधकांकडून अनेक टिका टिपण्या करण्यात आल्या, अपप्रचार करण्यात आला. मात्र भैय्या कधीच अशा गोष्टींना उत्तर देत नाहीत. तर ते न बोलता आपल्या कामातुन उत्तर देत असतात. समस्त राजापूर मतदार संघातील जनतेने ज्या विश्वासाने भैय्यांच्या हाती आपले नेतृत्व सोपवले आहे त्याला साजेसं असं काम भैय्या करून दाखवतील आणि राजापूर मतदार संघ जिल्हयातील एक आदर्श असा मतदार संघ, विकासाचे मॉडेल म्हणून उदयास आल्याशिवाय रहाणार नाही असा विश्वास हाजू यांनी व्यक्त करत समस्त मतदारांना धन्यवाद दिले आहेत.
————————————————————–











