चिपळुणात पहिल्या सम्यक साहित्य कला संगीतीचे उद्घाटन करताना केले प्रतिपादन!
‘आयदान’ कार लेखिका उर्मिलाताई पवार व ज वी पवार यांचा विशेष सन्मान!
चिपळूण (प्रतिनिधी): कोकण ही रत्नांची भूमी आहे . अनेक थोर रत्ने या भूमीने महाराष्ट्राला आणि देशाला दिले आहेत . पाच भारतरत्न दिले आहेत . अशा या कोकणाला समृद्ध वारसा लाभलेला आहे . मात्र साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात कोकणावर नेहमीच अन्याय होताना दिसतो. विशेषतः फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील , परिवर्तनाच्या चळवळीतील लेखक कलावंतांवरील हा अन्याय सहज लक्षात येण्यासारखा आहे. आणि म्हणूनच ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून फुले आंबेडकरांचा परिवर्तनाचा विचार उजागर केला पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा आंबेडकरी विचारवंत, दलित पॅंथरचे सहसंस्थापक ज वी पवार यांनी येथे केले.
कोकणातील फुले आंबेडकरी तथा परिवर्तनाच्या चळवळीतील साहित्यिकांनी एकत्र येऊन ‘ सहज संवाद ‘ च्या माध्यमातून ‘पहिली सम्यक साहित्य कला संगीती’ कोकणची सांस्कृतिक राजधानी ओळखल्या जाणाऱ्या चिपळूण शहरात चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी विचार मंचावर ‘आयदान ‘ कार लेखिका उर्मिलाताई पवार मासिक सद्धम्माचे संपादक प्रा. आनंद देवडेकर , लेखक रमाकांत जाधव, निमंत्रक सुनील हेतकर, संदेश पवार, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ज वी पवार पुढे म्हणाले, साहित्याच्या क्षेत्रात कोकणाला नेहमीच सापत्न वागणूक मिळते. मात्र तरीही कोकणाने आजवर नेहमीच इतिहास घडवलेला आहे . याच कोकणातून सामाजिक, राजकीय , शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नामवंत घडलेले आहेत. गोपाळबाबा वलंकरांनी परिवर्तनाच्या चळवळीची सुरुवात केलेली आहे. तसेच पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक समाजसुधारक, पाच भारतरत्न कोकणाने दिले आहे. म. दू. ताम्हनेकर, वि तु जाधव, रुके, नाट्यकलावंत तळवटकर, लेखक स्वतः मी, व इतर काही यांनी चळवळीचे काम करून आपले योगदान दिले आहे. याच कोकणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले स्मारक चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी या गावात बाबासाहेबांच्या हयातीतच उभे राहिले. तर बाबासाहेबांच्या हयातीतच पहिले चरित्र कराची मधून राजापूरचे श्री खरावतेकर यांनी काढले असल्याची आठवण करून दिली. त्यामुळे कोकणची भूमी ही नापीक नसून ती सुपीक आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात सम्यक साहित्यकला समितीच्या माध्यमातून कोकणातील साहित्यिकांचे भरीव योगदान राहील व त्या दृष्टीने त्यांनी काम करायला हवे असे आवाहनही केले माझ्यानंतरच्या पिढीने पुढे येऊन नव्या तरुणांना तरुणींना बळ देण्याचे काम करायला हवे आणि ते करण्यासाठीच हे पाऊल उचलल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ लेखिका उर्मिलाताई पवार आपल्या मनोगतात म्हणाल्या, आम्ही चळवळीतील महिला लिहू लागल्यानंतर आम्हालाही सुरुवातीला विरोध होऊ लागला . मात्र आम्ही सतत लिहीत राहिलो .बोलत राहिलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांचा विचार समाजासमोर मांडत राहिलो. आणि त्यातूनच स्वतःला घडवत राहिलो. समकालीन वातावरणात प्रस्थापित व्यवस्थेशी कधी टक्कर देऊन तर कधी जुळवून घेऊन आपल्या साहित्याला सिद्ध केले. आणि म्हणूनच जवी दादा असतील किंवा मी असेल किंवा अन्य इतर आंबेडकरी साहित्यिक असतील ते लोकमान्यता मिळवू शकले. समाजमान्यता मिळवू शकले. परंतु अशा प्रकारची लोकमान्यता व समाजमान्यता मिळवणारे चळवळीतील साहित्यिक फारच कमी आहे. मात्र इतरांचे साहित्य सक्षम समृद्ध असूनही प्रस्थापित व्यवस्थेने त्यांना मानसन्मान दिला नाही किंवा ते स्वीकारले गेले नाही त्यामुळे आगामी काळात आपल्यालाच एक पर्यायी व्यवस्था उभी करावी लागेल आणि त्यासाठी कोकणातील सर्व साहित्यिकांनी घेतलेला पुढाकार ही समाधानाची व आश्वासक गोष्ट वाटते आम्ही ज्येष्ठ साहित्यिक आपल्या सोबत असो आपल्या भूमिकेला आमचे समर्थन असेल असे सांगितले. तसेच त्यांनी परदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर आलेले विविध प्रकारचे अनुभव देखील कथन केले.
प्राध्यापक आनंद देवडेकर यांनी आपल्या मनोगतात कोकणाची विविध वैशिष्ट्ये कथन करून सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचा इतिहास मांडत असताना आंबेडकरी चळवळीने कोकणाला आणि या राज्याला काय दिले याचे समर्पक विवेचन केले. कोकणची भूमी ही ओसाड नसून सुपीक आहे, सध्या ती पडीक असली तरी आगामी काळात निश्चितपणे तिच्यातून चांगले पीक येईल असा आत्मविश्वास व्यक्त केला. लेखक रमाकांत जाधव यांनी सम्यक साहित्य कला संगीतीच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून कोकणामधील साहित्यिकांनी सुसंघटित होण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत आश्वासक आणि चळवळीला गती देणारा असल्याचे सांगितले.
यावेळी कादंबरीकार सुधीर जाधव यांच्या ‘ कामाठीपुरा’ या कादंबरीचे तसेच बाबुलाल नाईक यांच्या ‘ मूठ मूठ माती ‘ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सभागृहात पुस्तक प्रदर्शन लावण्यात आले होते, त्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटनही उर्मिला पवार व ज वी पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्मारक भावनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ज वी पवार व उर्मिलाताई पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर पत्रकार शाहीर दीपक पवार व अरुण कांबळे यांनी बा भिमा या वामनदादांच्या गीताने संगतीची सुरुवात केली. याप्रसंगी ज वी पवार व उर्मिला पवार यांना मानपत्र देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच या संगतीला उपस्थित असलेल्या सर्व साहित्यिकांचा परिचय प्रदीप नाईक यांनी करून दिला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी व प्रास्ताविक सुनील केतकर यांनी केले. आभार प्रदर्शन संदेश सावंत यांनी केले.
रात्री अखेरच्या सत्रात शाहीर संमेलन कवी राष्ट्रपाल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली रंगले . शाहीर जनीकुमार कांबळे यांनी त्यांना साथ दिली. त्यामधून आंबेडकरी चळवळीतील विविध विषयांवरील गीते व शाहिरी उत्कृष्टपणे सादर करण्यात आली.
कार्यक्रमास लेखक आनंद विंग, सुबोध मोरे ,अरुणा जगीयासी, कवयित्री संध्या तांबे, रोशनी नाईक, बुद्धदास कदम, विनय जाधव ,रवी देवगडकर , प्रथमेश तांबे ,जयश्री जाधव ,मल्लिका सिद्धार्थ, चंद्रभान गांगुर्डे , निखिल प्राजकते, चंद्रकांत सावंत, राजूभाई जाधव , संजय कदम,प्रकाश जाधव, किशोर कासारे, रवीकुमार जाधव, राजेश कदम, नामदेव डोंगरे, संजय गमरे, प्राध्यापक ज्ञानोबा कदम, आप्पा जाधव, दीपक तळवडीकर, अरुण नाईक, बुद्धराज नाईक , प्रा सिद्धार्थ तांबे, एडवोकेट संतोष भोसले, प्रा. प्रेमरत्न चौकेकर , राकेश खैरे, प्रा. संजय खैरे आदी उपस्थित होते.












