वेंगुर्ले शहरातील एकल वापर प्लास्टिक बंदी अभ्यास करण्यासाठी वेंगुर्ला न.प. ला जीआयझेड प्रतिनिधींची भेट

 

 

वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ला शहरातील एकल वापर प्लास्टिक बंदी अभ्यास करण्यासाठी जीआयझेड संस्थेच्या प्रतिनिधिनी वेंगुर्ला नगरपरिषदेस भेट दिली. तीन दिवसीय अभ्यास दौयामध्ये प्रतिनिधी श्री. गौरव सहानी, श्रीम. प्रियांका सिंग आणि श्रीम.ऐश्वर्या जैन यांनी शहरातील स्वच्छते संबंधी विविध उपक्रमांची पाहणी केली आणि माहिती घेतली.

मंत्रालय पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, महाराष्ट्र शासन व जीआयझेड यांच्या संयुक्त विद्यमाने नगर वन/नगर वाटिका योजना आणि एकल वापर प्लास्टिक बंदी उपक्रमांअंतर्गत “हवामान सह-लाभांचे” मूल्यांकन पद्धत विकसित करणेसाठी ही पाहणी होती. या भेटी दरम्यान त्यांनी, मागील पाच वर्षांत वेंगुर्ला शहरात एकल वापर प्लास्टिक वापरामध्ये झालेली घट व एकल वापर प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी राबविण्यात आलेले विशेष उपक्रम व जनजागृती कार्यक्रमांचे प्रभाव अभ्यासले. तसेच स्वच्‍छ भारत पर्यटन स्थळ येथील कचरा संकलन व्यवस्थापन, कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया, आणि पुनर्वापर प्रणाली या संबंधी सविस्तर माहिती घेतली. पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत नियमित पणे आयोजित करण्यात येणाऱ्या कांदळवन स्वच्छता मोहीम, तसेच विविध ठिकाणच्या स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, कचऱ्यातून कल्पकता संकल्पनेवर आधारित उद्यान अश्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली.

जीआयझेड संस्थेच्या प्रतिनिधींनी वेंगुर्ला शहराच्या स्वच्छता आणि पर्यावरणीय उपक्रमांची प्रशंसा करताना शून्य कचरा मॉडेलच्या प्रभावी अंमलबजावणीचे कौतुक केले. त्यांनी वेंगुर्ला शहराचा हा मॉडेल देशभर राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. वेंगुर्ला शहराने पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनामध्ये दाखवलेले नवोन्मेष इतर शहरांसाठी आदर्श ठरू शकते, असे त्यांनी सांगितले