देवरुख- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचा ९८वा स्थापना दिन नुकताच आनंदायी वातावरणात संपन्न झाला. स्थापना दिनी संस्थेचे संस्थापक आदरणीय स्व. काकासाहेब पंडित यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद, तसेच महाविद्यालयाचे संस्थापक आदरणीय स्व. तात्यासाहेब आठल्ये यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मान्यवरांनी आदरांजली वाहिली. यानंतर महाविद्यालयात मुख्य कार्यक्रमापूर्वी संस्था स्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्या व महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व संस्थापकांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले.
संस्था स्थापना दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. नारायणराव देशपांडे (प्रमुख, येरळा प्रकल्प) यांची उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, विश्वस्त प्रा. पांडुरंग भिडे, कृष्णकुमार भोसले, अशोक चाळके यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, संस्थेविषयीची माहिती आणि आभार प्रदर्शन प्रा. सीमा शेट्ये यांनी केले. प्रा. भिडे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्था स्थापनेपासूनचा ते आजपर्यंतचा शैक्षणिक व सह शैक्षणिक उपक्रमांचा व कार्यांचा सविस्तर आढावा घेतला. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी केला. यानंतर अतिथी श्री. नारायणराव देशपांडे यांचा संस्थेच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यानंतर प्रमुख अतिथींनी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, प्रा. डॉ. सागर संकपाळ आणि प्रा. डॉ. अनिल निकम यांना सन्मानित केले.
प्रा. डॉ. संकपाळ आणि प्रा. डॉ. निकम यांनी महाविद्यालय आणि संस्थेप्रती आपल्या मनोगतातून ऋण व्यक्त केले. अतिथी श्री. नारायणराव देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनात येरळा संस्थेची स्थापना सन १९७२ मधील दुष्काळापासून झाल्याचे व दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक योजना आखल्याचे याप्रसंगी नमूद केले. सन १९७६ मध्ये ३२ गावांकरता येरळा डेअरी प्रकल्प सुरू झाल्याची आठवण सांगून, त्या प्रकल्पाची झालेली आजपर्यंतची प्रगती विशद केली. येरळा नदीच्या काठावरच्या गावात फलोत्पादनाची झालेली सुरुवात, सन १९९२-९३ पासून जलसंचय व जलसंवर्धनाच्या कार्याची केलेली सुरुवात, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण आणि विज्ञान प्रचारासाठी मदत करण्याकरता प्रयोगशाळांचे केलेले आयोजन, वेश्यांच्या पुनर्वसनासाठी व त्यांच्या मुलांच्या विकासाठी केलेले कार्य, बदललेल्या शैक्षणिक पद्धतीनुसार केलेले प्रयोग सविस्तर कथन केले. यानंतर प्रकल्पावर आधारित विविध कार्यासंदर्भातील फिल्म उपस्थितांना दाखवण्यात आली.
संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात विकसित भारतासाठी महत्त्वाच्या वैचारिक विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकांकडून असणारी अपेक्षा याप्रसंगी सविस्तर व्यक्त केली. देशाच्या महत्त्वपूर्ण प्रगतीसाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीमध्ये शिक्षकांनी आणि शैक्षणिक संस्था कशाप्रकारे योगदान देऊ शकतात याबाबत सविस्तर विवेचन केले. सर्वांनी देशाच्या शांततेसाठी व विकासासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहनही याप्रसंगी केले. या कार्यक्रमाचे आयोजन स्व. द. ज. कुलकर्णी सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संस्था पदाधिकारी, सर्व आस्थापनांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधिक्षिका मीता भागवत, सौरभ मुळ्ये, किरण चाचे, सहाय्यक स्वप्निल दांडेकर, अमोल वेलवणकर आणि विलास तावडे यांनी मेहनत घेतली.












