शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी माजी आमदार नाईक व उबाठा प्रवक्ते केणींचा घेतला समाचार

मालवण | प्रतिनिधी : उबाठा गटाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्यावर शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी हल्लाबोल केला आहे. एका वाचाळवीराने रोज सकाळी उठुन तोंडाची बडबड करून पक्ष संपवला आणि हे मालवणातील वाचाळवीर मंदार केणी यांनी मालवण तालुक्यातील उरलीसुरली उबाठा संपवायचा विडा उचलला आहे. ते काम त्यांनी चोख पुर्ण करावे. राहता राहिला विकास कामांचा विषय तर वैभव नाईकांना आमदारकीच्या १० वर्षात जे शक्य झालं नाही, ती कामे लोकप्रिय आमदार निलेश राणे नक्कीच पुर्ण करतील.

चिपी – मुंबई विमानसेवा लवकरच सुरु करून मंदार केणींना त्याच विमानाने मुंबईला पाठवण्याची व्यवस्था करू, असा टोला राजा गावकर यांनी लगावला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गावकर यांनी म्हटले आहे की, वैभव नाईक हे १० वर्ष आमदार होते. त्यांच्या हातात सत्ता होती. काय केलं आमदारांनी…? लोकांच्या मूलभूत गरजाही पूर्ण करू शकले नाहीत. मालवण शहराच्या दुरावस्थेला संपूर्णपणे वैभव नाईक हेच जबाबदार आहेत. मालवण शहरातील सरकारी दवाखान्याच्या दुरावस्थेसाठीही वैभव नाईकच जबाबदार आहेत. मालवणातील जनतेने मालवण नगरपालिका वैभव नाईक यांच्या ताब्यात दिली पण काय केले ? विकासाच धोरणच तुम्हाला ठरवता येत नसेल तर तुम्ही विकास काय करणार ? विकासाच्या नावाखाली मालवण नगरपालिकेची जी दुरावस्था झाली त्यालाही जबाबदार वैभव नाईकच आहेत. कचऱ्याचे नियोजन नाही, भाजी मार्केटची अर्धवट राहिलेली वास्तू त्यात कंपाऊंडला लावलेले पत्र्यांचे कंपाऊंड तोडून अतिक्रमण करू देणारे त्यावेळचे बांधकाम सभापती कोण ? आणखी याला जबाबदार कोण…? दहा वर्षात मालवणसाठी कोणते विकासात्मक काम केलं हे दाखवून द्यावं…! मालवण एसटी स्टँडचेही अर्धवट राहिलेले काम हेही त्यातलेच एक उत्तम उदाहरण आहे.

दहा वर्ष आमदारकी भूषवुन सुद्धा जर वैभव नाईक निवडणुकीत पडत असतील तर खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक कार्यकर्ता दाखवावा की ज्याला वैभव नाईक यांनी मोठं केलं असेल. जनता तर बाजूलाच राहिली. कुठल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहिले असतील हे त्यांनी दाखवून द्यावे. गेली पाच वर्षांपूर्वी नाईक यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती जो अन्याय केला, त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपला बदला वैभव नाईकांच्या पराभवाच्या माध्यमातून पूर्ण केल्याचे राजा गावकर यांनी म्हटले आहे.

वैभव नाईक “आल्याचे” व्यापारी… हरी खोबरेकरांना केले बाजूला…

मंदार केणी यांनी आपली वायफळ बडबड आता बंद करणे योग्य कारण. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिणाम काय झाला हे जनतेने आता पाहिले. निवडणुकीदरम्यान त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना काय वागणूक दिली ? अगदी रीतसर आणि सोयीस्करपणे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना कसे बाजूला केले हे सर्वश्रुत आहे. अर्थात या गोष्टीला पण वैभव नाईकच जबाबदार आहेत कारण वेळोवेळी सर्वांना या गोष्टीची प्रचीती आहे की एखादा नवीन कार्यकर्ता त्यांना मिळाला की ते जुन्या कार्यकर्त्यांना वाळीत टाकतात ही अगदी पूर्वापार चालत आलेली त्यांची रीत आहे म्हणूनच आम्ही त्यांना “आल्याचे” व्यापारी म्हणायचो.

वैभव नाईकांनी दहा वर्षात किती महोत्सव भरवलेत ?

निवडणूक जाहीर झाल्यापासून ते आजपर्यंत इतके दिवस आम्ही शांत बसलो. परंतु आता नाही..! ह्या वाचाळवीरांना उत्तर द्यावेच लागेल म्हणून आज शेवटी ठरवलंच..! कारण जी अपेक्षा हे वाचाळवीर आमच्याकडून करत आहेत ती अपेक्षा त्यांचे माजी आमदार दहा वर्षात पूर्ण करू शकले नाहीत. ज्याप्रमाणे पर्यटन महोत्सवाबाबत मंदार केणी बोलत आहेत त्यांनी अगोदर हे सांगावे की दहा वर्षात त्यांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी असे किती महोत्सव मालवणमध्ये भरवलेत… बोलताना आणि आरोप करताना थोडं ताळतंत्र बाळगा… कारणनाईकांना जे शक्य झालं नाही त्याची अपेक्षा तुम्ही आमदार निलेश राणे साहेबांकडून करत आहात. काळजी करू नका तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद आम्ही ठेवतो. त्यामुळे आता तुम्हाला सांगतो की पर्यटन महोत्सव जर भरवायचाचं असेल तर तो मे महिन्यातच आम्ही भरवू. कारण सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे पर्यटन महोत्सवाची गरज नाही. पर्यटन महोत्सवाची खरी गरज ही एप्रिल मे मध्येच असते कारण सध्या जेवढे पर्यटक आपल्या मालवण मध्ये येतात दिवाळीनंतर डिसेंबर मध्ये त्यापेक्षा मे महिन्यात पर्यटकांची रेलचेल थोडी कमी असते. त्यामुळे अशा वेळेत जर पर्यटन महोत्सव भरवला तर आपल्याकडे पर्यटकांचा ओघ आणखीन वाढू शकेल म्हणून आम्ही एप्रिल किंवा मे मध्ये पर्यटन महोत्सव भरवु त्यामुळे तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही.

निलेश राणे गेली दहा वर्ष आमदार नसूनही त्यांनी लोकांची कामे केलीत, अडी अडचणीत सुखदुःखात धावून आलेत, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत, आमदार म्हणून निवडून आल्यापासून विधानसभेत मांडलेला पहिला प्रश्न मच्छीमारांचा होता. त्यामुळे मी बाबी जोगींना एक सल्ला देऊ इच्छितो की पत्रकार परिषदेच्या वेळी अशा वाचाळ वीरांच्या बाजूला बसण्यापेक्षा तुम्ही एक मच्छीमार नेते आहात मच्छीमारांच्या प्रश्नाबाबत तुम्ही नेहमी भांडत आलात. आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आता आमचे दुसरे आमदार नितेशजी राणे कॅबीनेट मंत्री झालेत थोड्याच दिवसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीही होतील… तसेच ते आता मत्स्योद्योग आणी बंदरे या खात्याचे मंत्री आहेत. मंत्रालयात आपल्या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दोन्ही खात्यांचा आढावा घेतला त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की पारंपरिक मच्छीमार हा जगायला पाहिजे त्यामुळे त्यांच्यावरती कोणताही अन्याय होऊ न देण्याचा त्यांनी निर्धार केलाय… त्यामुळे आता तुमच्यासारख्या पारंपारिक मच्छीमारांच्या नेत्यांनी असा वेळ फुकट न घालवता पारंपरिक मच्छीमारांच्या फायद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात कॅबिनेट मंत्री साहेबांना नक्कीच भेटून आपले समाधान करून घ्यावे. सोबत बसलेले भाई गोवेकर आपण तर ज्येष्ठ शिवसैनिक आहात बाळासाहेबांचे आचार आणी विचारांची मोट बांधून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी खरी शिवसेना पुनर्जीवित केली. आपल्यासारख्या जेष्ठ शिवसैनिक, विचारवंतांची खरी गरज या शिवसेनेमध्ये आहे. उबाठामध्ये राहून अशा वाचाळवीरांच्या बाजूला बसून आपला अमूल्य वेळ फुकट घालवण्यापेक्षा आमच्यासारख्या शिवसैनिकांच्या पाठीशी राहून बाळासाहेबांचे आचार आणी विचार पुढे नेण्यासाठी आपल्यासारख्या जेष्ठ शिवसैनिकांची गरज आहे…

राहता राहिला विमानतळाचा प्रश्न तर त्याची काळजी मंदार केणी तुम्ही करू नये. लवकरच तुम्हाला विमानाने मुंबईला पाठवण्यासाठी विमान सेवा सुरू करण्यात येईल. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नये. आणि कामाचा धडाका काय असतो हे नवनिर्वाचित आमदार आदरणीय निलेशजी राणे साहेबांनी सर्वांना दाखवून दिलेले आहेच. त्यामुळे येणाऱ्या काळात कशी आणि किती विकास कामे होतील हे पाहून तुमच्या तोंडच पाणी पळेल… त्यामुळे आता फक्त उपोषण आणी आंदोलन या गोष्टी करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही… आणि ती उपोषण आणि आंदोलन ही सुद्धा तुम्ही न केलेल्या कामांसाठीच असतील, असे राजा गावकर यांनी म्हटले आहे.