राजापूर : राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी जास्त रहदारी नसलेल्या अशा येरडव ते अणुस्कुरा या सुमारे तीन-चार किमी लांबीच्या ऐतिहासिक शिवकालीन पायवाटेची श्रमदानाने स्वच्छता करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या श्रमदानामुळे शिवकालीन पायवाटेवरील पुरातन पांडवकालीन श्री उगवाई देवीचे मंदिर, मराठी भाषेचा अनमोल ठेवा असलेला आणि शिवकाळातील चौथाई सरदेशमुखीचे अधिकार दिल्याचे निर्देशन करणारा अनेक वर्षापूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख… सतत वाहणारा पाण्याचा झरा… आदी शिवकालीन ऐतिहासिक ठेवा दृष्टीक्षेपात आला आहे. यामुळे शिवकालिन इतिहास उलगडण्यास मदत होणार आहे.
शिवकाळामध्ये रहदारी असलेली आणि सद्यस्थितीमध्ये बंद होवून दुर्लक्षित राहीलेल्या या पायवाटेने छत्रपती शिवाजी महाराज कोकणामध्ये आल्याचे इतिहास सांगतो. एवढेच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आलेले मुघल सैन्यही या पायवाटेने कोकणात खाली उतरल्याचे सांगितले जाते. या पायवाटेवरील चेक नाकाच्या खाणाखुणा पाहता या पायवाटेने शिवकाळामध्ये वाहतूकही चालण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पायवाट आणि अणुस्कूरा घाटाच्या माथ्यावर असलेला हा शिवकालीन ऐतिहासिक ठेवा पाहताना या ठिकाणावरून कोकण परिसर, अर्जुना धरण प्रकल्प अन् निसर्गसौंदर्य अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार असल्याने भविष्यामध्ये शिवप्रेमी, पर्यटकांसह हौशी ट्रेकर्सची पाऊले या परिसराकडे वळल्यास आश्चर्य वाटणार नाही.
घाटमाथ्यावरून कोकणामध्ये येणार्या अनेक पायवाटा आहेत. मात्र, कालपरत्वे रहदारी कमी झाल्याने या पायवाटा दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्यापैकी एक असलेली तालुक्यातील येरडव ते अणुस्कुरा ऐतिहासिक शिवकालीन पायवाट आहे. पाचल-येरडवमार्गे अणुस्कूरा घाटाच्या माथ्यावर जात मुख्य घाटमार्गाला जोडली जाणारी सुमारे तीन-चार किमीच्या या पायवाटेचा प्रवासासाठी वाहने उपलब्ध नसलेल्या काळखंडामध्ये कोकणातून घाट परिसरामध्ये ये-जा करण्यासाठी नजीकचा मार्ग म्हणून उपयोग केला जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अणुस्कूरा घाटमार्गाचे काम करताना अन्य पायवाटांप्रमाणे येरडव-अणुस्कूरा ही पायवाटही बंद झाली. मात्र, या शिवकालीन पायवाटेसह या मार्गावरील ऐतिहासिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
सध्या महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अनेक सामाजिक संस्था, शिवप्रेमी एकत्र येत शासनाकडे मागणी करत असतात. शासनाच्या पुरातत्व विभागाकडून अनेक गडकिल्ल्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होते. मात्र शिवप्रेमींच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आता शासनाला जाग आली असून अनेक गडकिल्ल्यांची दुरूस्ती सुरू झाली आहे. येरडव-अणुस्कूरा या शिवकालिन पायवाटेची नुकतीच विद्यार्थ्यांकडून स्वच्छता करण्यात आली. यामध्ये अनेक ऐतिहासिक गोष्टी समोर आल्या आहेत. यामुळे पुरातत्व विभागाने या गोष्टीची त्वरित दखल घेण्याची मागणी शिवप्रेमींमधून होत आहे.











